![]() |
प्रा. बी. जी. खाडे यांच्या 'वळून बघताना' कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) गावचे सुपुत्र व शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल चे प्राध्यापक डॉ. बी जी खाडे यांनी लिहिलेल्या 'वळून बघताना' या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच पनवेल येथे पार पडले. शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल चे माजी प्राचार्य व नांदेड विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस एम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रसिद्ध कवी, गझलकार, समीक्षक व शालेय शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक रोहिदास पोटे यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. स्वागत कवी प्रा. डॉ. बी. जी. खाडे यांनी केले. यावेळी बोलताना कविवर्य पोटे म्हणाले 'वळून बघताना' हा कविता संग्रह म्हणजे ५० वर्षांच्या पुढे वय असणाऱ्या ग्रामीण भागातून शहरात आलेल्या सामान्य कुटुंबातील समाजाचा प्रतिनिधी भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा त्याला जे दिसलं, जे भावलं आणि जे अनुभवलं ते मांडण्याचा प्रयत्न आहे. हा कवितासंग्रह म्हणजे जिंदगीची याद आणि 'बापा' विषयीची कृतज्ञता आहे. समाज चिंतन, नीती मूल्यांची चाड, अन्यायाची चीड, जगण्याची रीत, संवेदनशीलतेचे गीत या विचारांच्या सहजसुंदर रचनेचा बाज तसेच मुक्तछंदाचा समर्थपणे वापर काव्यसंग्रहातील कवितांतून दिसतो. कवितेत जेवढी रग आहे तेवढीच धग ही आहे. म्हणून या सर्व कविता वाचाव्याशा वाटतात. रसिक त्यांचे मनापासून स्वागत करतील अशी खात्री वाटते. असे गौरवोद्गार पोटे यांनी काढले. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ तयार केले आहे कु. रीचा खाडे यांनी.
याप्रसंगी जनगणना संचालनालय महाराष्ट्र चे उपसंचालक रमेश भोसले यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर, महाविद्यालयाचे आजी माजी प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना अंचलवार यांनी केले.
No comments:
Post a Comment