कौलगे - करेकुंडी मार्गावर बस चालू करण्याची मागणी, आगार व्यवस्थापकांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2025

कौलगे - करेकुंडी मार्गावर बस चालू करण्याची मागणी, आगार व्यवस्थापकांना निवेदन

 

चंदगड - करेकुंडी - बुक्कीहाळ- कोवाड या मार्गावर एस टी सेवा चालू करावी या मागणीचे निवेदन आगारप्रमुख सतीश पाटील यांना देताना मार्गावरील गावांचे ग्रामस्थ

तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा
       बहुजन मुक्ती पार्टी (ता. चंदगड) च्या वतीने होसूर भागातील कौलगे, बुक्कीहाळ खुर्द व बुद्रुक, करेकुंडी, मार्गावर एस टी बस सेवा चालू करण्या संदर्भातीत निवेदन चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांना देण्यात आले .
   चंदगड तालुक्यातील होसूर भागातील बुक्कीहाळ खुर्द, बुक्किहाळ बुद्रुक, कौलगे, कल्याणपूर तसेच करेकुंडी या गावांना करेकुंडी मार्गे बुक्कीहाळ खुर्द, कौलगे, होसूर रस्ता झाल्यानंतर या मार्गावरून चंदगड ढोलगरवाडी बेळगाव मार्गावरून काही काळ चंदगड आगाराची बस सेवा सुरू होती. तथापि थोड्याच दिवसात ती बंद पडली आहे.  बससेवे पासून वंचित असलेल्या या मार्गावर चंदगड, ढोलगरवाडी, करेकुंडी, बुक्किहाळ मार्गे बेळगाव व कोवाड बस पुन्हा सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे बहुजन मुक्ती पार्टी चंदगडच्या वतीने करण्यात आली आहे.
      शिक्षण, दवाखाना, आरोग्याच्या सुविधा, शासकीय कामे, आठवडी बाजार, इ. कामासाठी या भागातील लोकांना कोवाड व पाटणे फाटा, चंदगड या बाजारपेठेवर अवलंबून रहावे लागते. विविध कामानिमित्त त्याना जा-ये करावे लागते. तसेच या गावातील मुले प्राथमिक, माध्यमिक, पदवी शिक्षणासाठी कोवाड, हलकर्णी, कारवे, सुंडी या ठिकाणी जात असतात. बुक्कीहाळ ते सूंडी ला जाण्यासाठी दररोज ७ कि.मी चा पायी प्रवास करावा लागतो. होसूर पर्यंत ४ कि.मी चा पायी प्रवास करावा लागतो आणि कल्याणपूर ते कागणी पर्यंत ३ किमी पायी प्रवास करावा लागतो. एकिकडे भारत  अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, डिजिटल इंडिया च्या घोषणा सुरू आहेत. मात्र चंदगड तालुक्यातील बहुतांश गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अजूनही पायपीट करावी लागते आहे ही अतिशय निंदनीय बाब असून आम्ही याचा जाहिर निषेध करतो.
     बस अभावी या भागातील वृध्द, वयस्कर लोकांना देखील आरोग्य केंद्र कोवाड या ठिकाणी वैद्यकीय सुविधेसाठी जावे लागते. शासकीय कामासाठी व आठवडी बाजार साठी देखिल या मुख्य बाजार पेठामध्ये जाताना मोठी कसरत करावी लागते . या सर्वांचा विचार करून या मार्गावर त्वरीत एस टी सेवा चालू करण्याची मागणी बहूजन मुक्ती पाटीच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अमित तरवाळ, जोतिबा बिर्जे - सरपंच बुक्कीहाळ, लक्ष्मण आमरोळकर आदी अनेक ग्रामस्थांच्या सहया आहेत.

No comments:

Post a Comment