बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व आंदोलक
आजरा : गोपाळ गडकरी/ सी एल वृत्तसेवा
आजरा- बुरुडे रस्त्यावरील पडलेल्या प्रचंड आकाराच्या खड्ड्यांमुळे रोज लहान मोठे अपघात व वाहनांचे नुकसान होत आहे. याकडे बांधकाम विभागाचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष पाहून संतापलेल्या ग्रामस्थ, वाहनधारकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्र येत आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले.
शिवसेनेने आक्रमकपणे कंपनी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उबाठा शिवसेनेने रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करीत जाग आणण्यासाठी आंदोलनाचे निवेदन दिले होते. यासाठी तहसीलदार समीर माने यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात कंपनी ठेकेदार, बांधकाम विभागाचे अधिकारी, शिवसैनिक आणि बुरुडे व इतर रहिवासी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत तहसीलदार यांनी मध्यस्थीने बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्याकडून आठ दिवसात खड्डे मुजवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका संघटक संजय येसादे आणि तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी आक्रमक भूमिका घेत संतप्त सवाल करून अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. कंपनी आपल्याला या रस्त्याचा ठेका दिलेला नाही असे म्हणते तर बांधकाम विभागाचे अधिकारी ठेका दिला आहे असे म्हणतात. एकमेकाकडे बोटे दाखवण्याचा प्रकार थांबला पाहिजे. कामात समन्वयाची आवश्यकता आहे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरीष्ठाशी संपर्क साधून योग्य मार्ग काढणे आवश्यक होते. असेही यावेळी सांगण्यात आले.
माणसे मेल्यावर तुम्हाला जाग येणार का? एकमेकाकडे बोट दाखवून आमची आणि तालुकावासियांची दिशाभूल करू नका. आमच्या सहनशिलतेचा अंत बघू नका, वेळप्रसंगी आम्ही अधिकाऱ्यांना कोंडून घालण्यास कमी करणार नाही. अशी आक्रमक भूमिकाघेत अधिकारी व ठेकेदार यांना फैलावर घेतले. यावेळी आय सी कंपनीचे पर्यवेक्षक धनंजय गवळी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी सुर्वे यांनी आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. जर आठ दिवसात खड्डे भरले नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठकीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसेना यांच्यासह निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, बुरुडे सरपंच वैषाली गुरव, उपसरपंच सुनील बागवे, हत्तीवडे उपसरपंच प्रमिला पाटील, मेंढोली सरपंच विलास जोशीलकर, हरिश्चंद्र व्हराकटे, ओंकार माद्याळकर, सूर्यकांत कांबळे, महेश पाटील, गीता देसाई, सुयश पाटील, दिनेश कांबळे, कारखाना संचालक हरिभाऊ कांबळे, सुनील डोंगरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment