कर्नाटकी बेंदूर निमित्त कालकुंद्रीसह कर्यात भागात बैलांचे पूजन - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2025

कर्नाटकी बेंदूर निमित्त कालकुंद्रीसह कर्यात भागात बैलांचे पूजन

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

   चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळा बेंदूर निमित्त शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांची तसेच पशुधनाची पूजा करून त्यांना नैवेद्य व गोडधोड खाऊ देण्यात आले. 

      चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो तथापि पूर्व भागातील म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, निट्टूर, कोवाड, कालकुंद्री, किणी, कागणी,  कुदनूर, किटवाड ते राजगोळी खुर्द पर्यंतच्या २५-३० गावांच्या परिसरात पारंपरिक पद्धतीने कर्नाटकी बेंदूर सण साजरा केला जातो. या दिवशी बैल म्हणजे ऋषभ पूजन केले जाते. बैल व पशुधनाला आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना तेल किंवा वॉरणीश रंग, वर्षभर मानेवर जू घेऊन कष्ट  केलेल्या अंगावर काव लावून झुली घातल्या जातात. अनेक गावात बैल जोड्यांच्या मिरवणुका काढल्या जातात.

     आज सायंकाळी कालकुंद्री येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावातील बैलाना  मिरवणुकीने एकत्र आणून फटाक्यांच्या आतशबाजीत पूजन करून त्यांच्या बद्दलचे ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी शर्यतीच्या पाड्यांसह गावातील हौशी शेतकरी बंधू बैल जोड्यांसह उपस्थित होते.

No comments:

Post a Comment