कुदनूर येथील रखडलेल्या शिवस्मारकाचे काम मार्गी लावणार -शिवाजीराव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2026

कुदनूर येथील रखडलेल्या शिवस्मारकाचे काम मार्गी लावणार -शिवाजीराव पाटील


कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

      कुदनूर (ता. चंदगड) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम गेली दोन-तीन वर्षे रखडले आहे. ही गोष्ट आपणा सर्वांना भूषणावह नाही. हे स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी लागेल ते सहकार्य आपल्याकडून होईल. अशी ग्वाही चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी कुदनूर येथे दिली. 

     देशातील सर्वात उंच पुतळा म्हणून चर्चेत असलेल्या कुदनूर येथील बहुचर्चित शिवस्मारकाचे काम रखडले आहे. जवळपास २५ फूट उंचीचा दगडी चौथरा बांधून तयार आहे. अश्वारूढ पुतळाही पूर्ण झाला असून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे बंदिस्त स्वरूपात आहे. पण पुढील कार्याला चालना मिळत नाही. ही बाब कुदनूर येथील भाजप संघटक डॉ. संदेश बाबुराव जाधव यांनी कालकुंद्री येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रम स्थळी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आमदारांनी तात्काळ कुदनूर ला भेट देत शिवस्मारक उभारणीचे काम का रखडले आहे? याची सविस्तर माहिती घेतली. यानंतर स्मारक स्थळावरूनच थेट जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून या संदर्भात चर्चा केली. यावेळी आमदार फंडातून स्मारक सुशोभीकरणासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आवाहन आश्वासन दिले. 

   यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे राजाराम मोहनगेकर, राजू रेडेकर, भावकू गुरव, माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, वैभव शिंदे आदींसह स्मारक कमिटी सदस्य व कुदनूर ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. संदेश जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment