मतदान काळात कडक निर्बंध, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत आदेश - निवडणुक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, चंदगड तहसिल कार्यालयात बीएलओंना मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2026

मतदान काळात कडक निर्बंध, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत आदेश - निवडणुक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, चंदगड तहसिल कार्यालयात बीएलओंना मार्गदर्शन

बीएलओंना मार्गदर्शन करताना निवडणुक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण व निहाल मुल्ला

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्र व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर, शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते मतदानाच्या दिवशी शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. अशा सूचना चंदगड तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बीएलओ मिटींगमध्ये देण्यात आल्या.

बैठकीला उपस्थित असलेला बीएलओ

    या कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान केंद्र परिसरात मोबाईल फोन, वाहने तसेच शस्त्र बाळगणे व वापरणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला बुथ स्थापन करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरणे तसेच सर्व प्रकारची वाहने वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

    तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट बाळगणे किंवा वापरणे तसेच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल, अशी कोणतीही कृती करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्र परिसरात फक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून, इतर कोणालाही थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

    दरम्यान, येणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून सर्व स्तरावर दक्षता घेतली जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

    या प्रशिक्षण सत्रात तहसीलदार राजेश चव्हाण यांनी प्रास्ताविक करत सभेचा उद्देश स्पष्ट केला. निवडणूक विभागाचे टेक्निकल इन्चार्ज निहाल मुल्ला यांनी संपूर्ण सभेचे नेटके व शिस्तबद्ध नियोजन केले.  

No comments:

Post a Comment