चंदगडमध्ये ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, २११ मतदान केंद्रांवर १०५५ कर्मचारी तैनात, मतपेट्या रवाना - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2026

चंदगडमध्ये ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, २११ मतदान केंद्रांवर १०५५ कर्मचारी तैनात, मतपेट्या रवाना

 

इंडॉल मैदानावर कर्मचाऱ्यांना सुचना देताना तहसिलदार राजेश चव्हाण

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक - २०२६ शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तहसील प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. आज तहसील कार्यालय चंदगड यांच्या वतीने इंडॉल मैदानावर मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशासकीय सूचना देऊन मतपेट्या व निवडणूक साहित्य संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले.

    तालुक्यातील सुमारे १ लाख ५३ हजार १४८ मतदारांसाठी ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणांअंतर्गत ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण ९ उमेदवार तर पंचायत समितीसाठी २६ असे एकूण ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनाने अत्यंत काटेकोर नियोजन केले असून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

    आज सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्व मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मतदान प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि कोणताही गैरप्रकार होवू नये, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

    तालुक्यातील २११ मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक केंद्राध्यक्ष, एक केंद्राधिकारी, दोन ते तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी अशा प्रकारे प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यानुसार एकूण १०५५ कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. याशिवाय, अत्यावश्यक सेवेसाठी प्रत्येक २६ केंद्रांमागे राखीव कर्मचारी दल ठेवण्यात आले आहे.

    मतदान कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी व निवडणूक साहित्य वितरणासाठी २२ बसेस, ४९ क्रुझर, झोनल अधिकाऱ्यांसाठी २३ चारचाकी वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी सहा आणि पोलीस दलासाठी पाच वाहने तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे निवडणूक व्यवस्थापनासाठी भक्कम लॉजिस्टिक यंत्रणा उभारण्यात आल्याचे स्पष्ट होते.

    शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सतत गस्त, देखरेख व तत्काळ प्रतिसाद देण्याची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

    यावेळी प्रशासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना निष्पक्षता, शिस्त व जबाबदारीने काम करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. लोकशाही प्रक्रियेतील हे महत्त्वाचे पर्व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले.

No comments:

Post a Comment