निट्टूर कुस्ती मैदानात कुंडलच्या पै. सनी मदने याने प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली, सेनादलाचा पै. अनिरुद्ध पाटील पराभूत, अन्य ७० चटकदार कुस्त्यांनी शौकीनांची मने जिंकली - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2026

निट्टूर कुस्ती मैदानात कुंडलच्या पै. सनी मदने याने प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली, सेनादलाचा पै. अनिरुद्ध पाटील पराभूत, अन्य ७० चटकदार कुस्त्यांनी शौकीनांची मने जिंकली

  

पै. सनी मदने (डावीकडे)व पै. अनिरुद्ध पाटील (उजवीकडे) यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना मान्यवर 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       निट्टूर (ता. चंदगड) येथील बलभीम तालीम मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित गुढीपाडवा कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत क्रांती कारखाना कुंडल चा पै. सनी मदने यांने सेनादलाचा नॅशनल चॅम्पियन पै. अनिरुद्ध पाटील ला  ९ व्या मिनिटात घुटना डावावर चितपट केले. ही कुस्ती माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आ. राजेश पाटील, पंस. सभापती विलास नाईक, माजी जिप. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. 

पै. सनी मदने याने पै. अनिरुद्ध वर घुटना डावाची पकड घेतली तो क्षण

      आखाडा पूजन माजी कुस्तीगीर रेल्वे पोलीस हनुमंत पाटील, मधुकर नाईक व सरपंच गुलाब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत पै. भरत पवार (कुंडल) याला  पै. प्रकाश इंगळगी (घोडगेरी) याने एकलंगी डावावर पराभूत केले, तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत स्वप्नील शिंदे (कुस्ती संकुल टिटवे) याने संजू इंगळी (इंगळगी) याला घुटना डावावर चितपट केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ पाटील (कंग्राळी खुर्द) याने अध्ययन एडके (कवठेपिराण) याला एकलंगी डावावर चितपट करत हजारो कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. याशिवाय मैदानात अनुक्रमे पै. प्रथमेश हट्टीकर (कंग्राळी), काशिम इंगळी, विनायक पाटील (येळ्ळूर), सनी कुसाळे (राशीवडे), विनायक गुरव (तुर्केवाडी), हरी पवार (टिटवे), प्रथमेश कदम (कुंडल), महांतेश (इंगळी) तेजस लोहार (राशिवडे),  केदार मगदूम (कवठेपिरान) प्रज्वल पाटील (टिटवे), सनी अस्वले, सुयश तापेकर, सिद्धार्थ घोसरवाडे (राशिवडे), साई पाटील (कंग्राळी खुर्द), सतबा भिंगुडे (तेऊरवाडी), श्रीजीत पाटील, पांडुरंग नाईक, अविनाश पाटील, आरव पाटील (सर्व निट्टूर) आदी पैलवानांनी प्रतिस्पर्ध्यांवर नेत्रदीपक विजय मिळवले. क्रमांक ६ ची पै. धनाजी बिचुकले (कुंडल) विरुद्ध पै. पृथ्वीराज पाटील (कंग्राळी खुर्द) यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. याशिवाय मैदानात पन्नास वर काटाजोड कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. मैदानी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, लक्ष्मण भिंगुडे, भैरू पाटील, कल्लाप्पा वर्पे, मारुती पाटील आदींनी काम पाहिले. 

     यावेळी मोतीबाग तालमीचे वस्ताद म्हणून निवड झाल्याबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशिलकर यांचा नगर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दैनिक पुढारीचे पत्रकार व डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक नेते शंकर मनवाडकर, गोविंद पाटील, कोवाड मर्चंट पतसंस्था चेअरमन दयानंद मोटूरे, ॲड संतोष मळवीकर, कोवाडचे माजी उपसरपंच चंद्रकांत कुंभार,  पंचायत समिती सदस्य मधुकर आंबेवाडकर, हेमरस शुगरचे नामदेव पाटील, केंद्र प्रमुख एस. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कुस्ती निवेदक कृष्णात चौगुले यांनी धावते समालोचन केले. सूत्रसंचालन प्राचार्य वाय. व्ही. कांबळे व के. के. पाटील यांनी केले. हनुमंत घुले (कसबा सांगाव) यांच्या रणहलगीने मैदानात चैतन्य निर्माण केले होते. मैदानाच्या यशस्वीतेसाठी बाळू जाधव, नेत्रपाल हडलगेकर, दत्ता पाटील, यल्लाप्पा पाटील, भारत पाटील आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment