![]() |
| राजमार्ग १८७ पारगड- मोर्ले रस्त्यासाठी ३५ वेळा आंदोलने तरीही काम अपूर्ण, उपोषणानंतर दोडामार्ग हद्दीत डागडुजी, 'चंदगड' मात्र ढिम्मच |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
अनेक आंदोलनानंतरही गेली सहा वर्षे रखडलेल्या पारगड- मोर्ले रस्त्याचे भिजत घोंगडे अद्याप तसेच आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्व. बांधकाम विभाग दोडामार्ग कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार (पारगड) व प्रदीप सिताराम नाईक (भेडशी) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आमरण उपोषणानंतर बांधकाम विभागाने दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) हद्दीतील ६.५ किमी रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. मात्र चंदगड (जि. कोल्हापूर) हद्दीतील अडीच किमी रस्त्याबाबत कोणत्याच हालचाली दृष्टीपथात नसल्याने ग्रामस्थ व आंदोलकांत संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगड ते मोर्ले पासून पुढे कोकण व गोव्यात जाणाऱ्या रस्त्यापैकी ९ किमी लांबीचा रस्ता ६ वर्षांपासून रखडला आहे. राजमार्ग १३१ क्रमांकाचा हा रस्ता आता 'राजमार्ग १८७' म्हणून ओळखला जातो. शिवकाळापासून ब्रिटिश काळापर्यंत पारगड व सिंधुदुर्ग या दोन्ही किल्ल्यां दरम्यान याच मार्गाने वाहनांची येजा व्हायची.
पर्यटन व वाहतूक दृष्ट्या या महत्त्वाच्या रस्त्यासाठी सन २०१७ मध्ये सावंतवाडीचे आ. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर १४ कोटी रुपये निधीतून रस्ता सपाटीकरण, मोऱ्या बांधकाम, गटार खुदाई, शासकीय जमीन हस्तांतरण अशी कामे झाली आहेत. पुढील कामांच्या पूर्ततेसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण, ठिय्या, रस्ता रोको अशी अनेक आंदोलने केली. तथापि बांधकाम व वन विभागातील समन्वयाचा अभाव, लोकप्रतिनिधीं मधील इच्छाशक्तीचा अभाव व अनास्थेमुळे खडीकरण, डांबरीकरण रखडल्याचा आरोप होत आहे.
चंदगडचे तत्कालीन आमदार कै. व्ही. के. चव्हाण- पाटील व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत १९८६ मध्ये या रस्त्यासाठी पहिल्यांदा सर्वे झाला. तथापि ४० वर्षानंतरही रस्त्याची पूर्तता नाही. हा रस्ता झाल्यास चंदगड, बेळगाव, निपाणी, संकेश्वर परिसराचे गोवा सिंधुदुर्ग कोकण व गोव्याला जोडणारे अंतर २५ किमी ने कमी होणार असून धोकादायक घाट नसल्याने प्रवासही सुरक्षित होणार आहे. दुसरीकडे पारगड किल्ला, आंबोली, तिलारी परिसरात पर्यटकांची संख्या वाढून भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी दि.२५ फेब्रुवारीच्या उपोषणानंतर रस्त्याची गरज, वारंवार होणारी आंदोलने, दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन रस्ता बांधकामासाठी १० कोटी तर रस्त्यात जाणाऱ्या खाजगी जमीन भूसंपादनासाठी ५ कोटी अशी १५ कोटी रुपयांची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. या रस्त्यापैकी दोडामार्ग च्या तुलनेत चंदगड तालुक्यातील अंतर कमी म्हणजे केवळ २ किमी असल्याने यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या टप्प्याचे खडीकरण आ. शिवाजी पाटील यांनी पुढाकार घेऊन पूर्ण करावे. अशी मागणी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांच्यासह कान्होबा माळवे, विठ्ठल शिंदे, शांताराम आडाव, कृष्णकांत शिंदे आदी ग्रामस्थांनी केली आहे.
सुविधा द्या किंवा पारगड किल्ल्यासह परिसरातील गावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घाला..! ग्रामस्थांची मागणी.…..
शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्य रक्षणासाठी अजिंक्य किल्ले पारगड येथील मावळ्यांनी गेली साडेतीनशे वर्षे गरीबी हालअपेष्टा सोसत किल्ल्याचे रक्षण केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अन्य किल्ल्यांचे संवर्धन व परिसर विकासासाठी निधी उपलब्ध होत असताना पारगड मात्र दुर्लक्षितच राहिला आहे. आजही गडावरील रहिवाशांना पिण्यासाठी पुरेसे पाणीही नाही. एकीकडे पारगड- मोर्ले रस्त्याची मागणी ४० वर्षानंतर ही पूर्ण होत नसताना दुसरीकडे हेरे ते पारगड मार्गावरील दोडामार्ग तालुक्यात येणाऱ्या तेरवण व पेंढारवाडी या दोन गावांसाठी त्यांनी तेरवण- मेढे रस्ता दोन वर्षात मंजूर करून तो पूर्णत्वास नेला आहे. एकंदरीत पारगड किल्ला व परिसरातील इसापूर, नामखोल, पारगड, मिरवेल या चार गावांना असुविधांच्या गर्तेत ढकलण्यापेक्षा आम्हाला कोल्हापूर मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घालावे..! अशी निर्वाणीची मागणी सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी केली आहे. विशेष म्हणजे हीच मागणी चाळीस वर्षांपूर्वी तत्कालीन जाणत्या मंडळींनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

No comments:
Post a Comment