
जेलूगुडे येथे सिद्धीविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे यांच्या नाट्यप्रयोगानंतर कलाकारांसमवेत ग्रामस्थ
संपत पाटील - चंदगड / सी एल वृत्तसेवा
कोकणच्या समृद्ध लोककलेचा वारसा असलेली दशावतार नाटक लोककलेची चंदगड तालुक्यातील रसिकांना भुरळ पडू लागली आहे. नाट्य रंगभूमी, सिने रसिकांना दशावतारी कला आजही थक्क करून सोडते. गोवा व कोकणातील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला दशावतारी नाटकांना कोकणच्या सीमेवरील चंदगड तालुक्यातही लोकाश्रय मिळू लागला आहे. विशेषतः चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात पंधरा दिवस शिमगोत्सवाची धूम सुरू असते. या निमित्ताने जेलुगडे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या पिकुळे (ता. दोडामार्ग) येथील सिद्धीविनायक दशावतारी नाट्य मंडळाच्या 'गरुड प्रताप' ह्या नाट्यपुष्पाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कोकणातील लोककलाकारांनी दशावतारी नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आम्हा घाटमाथ्यावरील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असे उद्गार कार्यक्रमाचे उद्घाटक विठोबा गावडे यांनी व्यक्त केले. लोप पावत चाललेल्या या कलेला चंदगड तालुक्यातील रसिकांनी दिलेले प्रोत्साहन आम्हाला नवीन ऊर्जा देईल असे भावनिक उद्गार दशावतारी मंडळाचे मालक रत्नदीप गवस यांनी काढले. यावेळी त्यांच्यासह गवस यांच्यासह सर्व कलाकारांचा ग्रामपंचायत च्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच कृष्णा नाईक, सर्व ग्रा.पं. सदस्य, गावचे मानकरी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ नार्वेकर, महादेव गावडे, वसंत गावडे, तानाजी गावडे, एकनाथ गावडे, दीपक गावडे, भैरवनाथ गावडे, श्रीकांत गावडे, पांडुरंग गावडे, शिवाजी गावडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. गणपत गावडे यांनी केले. प्रकाश गवस यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment