
महावितरण संघाला विजेतेपदाचा व फिरता चषक देताना पी. के. गायकवाड सोबत चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य
चंदगड : श्रीकांत पाटील
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित 'पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग २०२६' स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. शनिवार दि. २८ मार्च २०२६ रोजी बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावरील इंडाल क्रीडांगणावर स्पर्धेचे उपांत्य व अंतिम सामने पार पडले. थरारक अंतिम सामन्यात महावितरण विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) टीमचा पराभव करून विजेतेपदाचा व दक्ष कलेक्शन फिरता चषक पटकावला.
![]() |
| उपविजेतेपदाचा चषक स्विकारताना पीडब्ल्यूडी टिमचे खेळाडू |
चंदगड तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मानाच्या ठरलेल्या या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाही या स्पर्धेत चंदगड तालुक्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे १६ संघ सहभागी झाले होते. यात चंदगड न्यायालय, पोलीस, एस टी महामंडळ, पंचायत समिती, तहसील कार्यालय, बँकिंग असोसिएशन, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), वन विभाग, नगरपंचायत, पत्रकार, कृषी विभाग, एचडीएफसी बँक, एलआयसी, महा-ई-सेवा आदी १६ संघांचा समावेश होता.
![]() |
| तृतीय क्रमांकाच्या चषकासोबत विजेते चंदगड एसटी आगाराचे व्यवस्थापक सतीश पाटील व खेळाडू सोबत पत्रकार संघाचे पदाधिकारी |
यापैकी तहसील कार्यालय, महावितरण, चंदगड एसटी आगार व पीडब्ल्यूडी हे चार संघ उपांत्य फेरीत दाखल झाले होते. पीडब्ल्यूडी विरुद्ध तहसील कार्यालय यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पीडब्ल्यूडी ने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली तर महावितरण आणि एसटी यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात महावितरण संघ विजयी झाला होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत एसटी महामंडळाने तहसील कार्यालयाचा पराभव करत तिसरा क्रमांक पटकावला.
अंतीम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पीडब्ल्यूडी संघाने ६ षटकात ३० धावा करत विजयासाठी महावितरण समोर ३१ धावांचे लक्ष ठेवले होते. ते महावितरण ने पाचव्या षटकातच पूर्ण करत स्पर्धेचे अजिंक्यपद दुसऱ्यांदा पटकावले. या संपूर्ण स्पर्धेत महावितरण संघाचे क्षेत्ररक्षण लक्षवेधी ठरले होते. यापूर्वी सन २०२३ च्या पहिल्या सत्रात महावितरणने अजिंक्यपद पटकावले होते (उपविजेता खेडूत स्पोर्ट्स). सन २०२४ मध्ये डाना ग्रुप- ॲटलास विजेता (उपविजेता महावितरण) तर २०२५ चे अजिंक्यपद बँकिंग असोसिएशन टीमने पटकावले होते यावेळी चंदगड पोलीस संघ उपविजेता ठरला होता. यंदा पुन्हा एकदा महावितरण अजिंक्यपद पटकावत 'दक्ष कलेक्शन कोवाड' पुरस्कृत फिरत्या चषकावर आपला कब्जा केला आहे.
दिवाणी व फौजदारी न्यायालय चंदगडचे तत्कालीन न्यायाधीश ए. सी. बिराजदार, सहन्यायाधीश चारुदत्त शिपकुले व चंदगड चे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून ही स्पर्धा चंदगड तालुका पत्रकार संघाने सुरू केली होती. शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजातून विरंगुळा व आनंदाचे क्षण निर्माण करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होणारी ही एकमेव स्पर्धा असल्याने चंदगड मध्ये आलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गात कौतुक व चर्चेचा विषय ठरली आहे.
यंदा स्पर्धेचे उद्घाटन चंदगड न्यायालयाचे सहन्यायाधीश वामन जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी "या स्पर्धेमुळे चंदगड तालुक्यातील विविध शासकीय नामशासकीय कार्यालयांचा परस्पर समन्वय दृढ झाला असल्याचे सांगताना येथून बदली होऊन जाताना प्रत्येक कर्मचारी स्पर्धेच्या निमित्ताने मिळालेल्या आनंदी क्षणांची शिदोरी सोबत घेऊन जातो." असे गौरवोद्गार काढले. यावेळी चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, आगार व्यवस्थापक सतीश पाटील, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर आदी मान्यवरांची भाषणे झाली.
स्पर्धा काळात तहसीलदार राजेश चव्हाण, पीडब्ल्यूडी चे अभियंता इफ्तेकार मुल्ला, चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे, पं.स. सदस्य रवींद्र बांदिवडेकर आदी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धेचे नेटके आयोजन कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
अंतिम सामन्यानंतर दक्ष कलेक्शन कोवाडचे मालक पी. के. गायकवाड, पंस. सदस्य रवींद्र बांदिवडेकर, आगार व्यवस्थापक सतीश पाटील, पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष संतोष सावंत - भोसले, माजी अध्यक्ष श्रीकांत पाटील, नंदकुमार ढेरे, अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे यांच्या हस्ते अनौपचारिक बक्षीस वितरण करण्यात आले. (स्पर्धेचा मुख्य बक्षिस वितरण समारंभ लवकरच स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे). यावेळी स्पर्धा प्रमुख व सी एल न्यूज चे संपादक संपत पाटील, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल पाटील, सचिव चेतन शेरेगार, सदस्य सागर पाटील, उत्तम पाटील, संजय पाटील, संतोष सुतार, मारुती पाथरवट, संदीप तारीहाळकर, सचिन तांदळे, एस के पाटील, राजेंद्र शिवणगेकर, लक्ष्मण आडाव आदी पत्रकार उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पतसंस्था फेडरेशनचे रवींद्र जांभळे, एलआयसीचे अभिजीत तळगुळकर, कृषी विभागाचे दिगंबर सूर्यवंशी आदींसह इंडाल कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


No comments:
Post a Comment