थकीत पगारासह विविध मागण्यांसाठी दौलत कारखाना कामगारांचे चंदगडमध्ये आमरण उपोषण सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2026

थकीत पगारासह विविध मागण्यांसाठी दौलत कारखाना कामगारांचे चंदगडमध्ये आमरण उपोषण सुरू

 


चंदगड / प्रतिनिधी

   अथर्व इंटरट्रेड प्रा. लि., लिज्ड युनीट दौलत शेतकरी सह. साखर कारखाना, हलकर्णी मधील साखर कामगारांच्या विविध प्रलंबीत न्याय मागण्यांबाबत 'चंदगड तालुका साखर कामगार युनियन (CITU)' च्या नेतृत्वाखाली आज, २ एप्रिल २०२६ पासून चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ झाला आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या तीन महिन्यांचा थकीत पगार तत्काळ मिळावा, या मुख्य मागणीसह मागील हंगामातील रिटेनिंग अलाउन्स आणि चालू हंगामातील ओव्हरटाईमचे पैसे त्वरित देण्याची मागणी कामगारांनी केली आहे. कारखाना प्रशासनाने वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, "आता नाही तर कधीच नाही" असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

या आंदोलनाद्वारे कामगारांनी त्रिपक्षीय कराराची १००% अंमलबजावणी करणे, हंगामी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे आणि कामगारांच्या बेकायदेशीरपणे केलेल्या बदल्या त्वरित रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. युनियनच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या शेकडो कामगारांनी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मांडला असून, जोपर्यंत मागण्यांची लेखी पूर्तता होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, कारखाना व्यवस्थापन यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment