विराट हिंदू संमेलनातून समाजजागृती : व्यसनमुक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश, ढोल-ताशांच्या गजरात रॅली : शिवकालीन खेळ, रामरक्षा पठण, गोमाता पूजनाने सोहळ्याला धार्मिक उंची - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2026

विराट हिंदू संमेलनातून समाजजागृती : व्यसनमुक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश, ढोल-ताशांच्या गजरात रॅली : शिवकालीन खेळ, रामरक्षा पठण, गोमाता पूजनाने सोहळ्याला धार्मिक उंची

चंदगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य उत्सव : हजारो रामभक्त, महिला भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग; शहर भक्तिमय वातावरणात रंगले.



चंदगड / प्रतिनिधी 

चंदगड नगरीत गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या महिला भजनी मंडळे आणि हजारो रामभक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी चौकात हिंदू ध्वजाच्या पूजनाने झाली. बेळगाव येथील पू. हरीगुरु महाराज आणि संयोजक लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते पूजन पार पडले. त्यानंतर निघालेल्या रॅलीने ढोल, ताशा, मृदंग, टाळ-चिपळ्यांच्या गजरात बाजारपेठेतून भव्य मार्गक्रमण केले.

रॅलीत आश्वारूढ स्वरूपात सहभागी झालेले हरीगुरु महाराज आणि गोपाळ स्वामी हे आकर्षणाचे केंद्र ठरले. प्रभू श्रीरामांच्या जयघोषात, भजनांच्या सुरावटीत आणि लाठीकाठी, ढालपट्टा यांसारख्या शिवकालीन खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना भारावून टाकले. हरिनामाच्या गजरात निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत देव रवळनाथ मंदिराच्या मागील मैदानात दाखल झाली.


संमेलनस्थळी दीडशेहून अधिक भगिनींनी सामूहिक रामरक्षा पठण करत वातावरण भक्तिमय केले. यावेळी गोमाता पूजन, राष्ट्रमाता प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन धार्मिक विधींनुसार पार पडले.

कार्यक्रमात पू. हरीगुरु महाराज, गोपाळ स्वामी, मिलिंद वाईकर, विजया वेसणेकर, भास्कर कामत, अशिष दाणी, विठेश्वर महाराज, महादेवी वैहनजी, लक्ष्मण गावडे, दयानंद काणेकर, भाऊ गोंधळी यांचा शाल देऊन गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक जोतिबा पाटील यांनी केले. पू. हरीगुरु महाराज यांनी मार्गदर्शन करताना तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून संस्कार जपावेत, तसेच हिंदू एकतेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. विजया वेसणेकर यांनी मातृशक्तीच्या भूमिकेवर भर देत संस्कार व कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. मिलिंद वाईकर यांनी इतिहासातील उदाहरणे देत धर्मजागृतीची गरज स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विजय कडूकर व पुनम कडूकर यांनी केले. यावेळी अर्चना ढेरे, दीपक वडर, अरुण देशपांडे, गोविंद मासरणकर, शारदा काणेकर, नामदेव मांगले, बाबुराव हळदणकर, नामदेव पाटील, श्रीशैल नागराळ, संजय ढेरे, सचिन नेसरीकर, भाऊ गोंधळी आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभारप्रदर्शन दयानंद काणेकर यांनी केले.

भक्ती, परंपरा आणि सामाजिक जागृतीचा संगम घडवणारा हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा चंदगडच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारा ठरला.

No comments:

Post a Comment