चंदगडमध्ये ‘निराधार’ योजनेत विक्रम; एकाच बैठकीत ६२० अर्जांना मंजुरी, आतापर्यंत तीन बैठकींत एकूण १,२५७ लाभार्थ्यांना मंजुरी - अध्यक्ष लक्ष्मण गावडे - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2026

चंदगडमध्ये ‘निराधार’ योजनेत विक्रम; एकाच बैठकीत ६२० अर्जांना मंजुरी, आतापर्यंत तीन बैठकींत एकूण १,२५७ लाभार्थ्यांना मंजुरी - अध्यक्ष लक्ष्मण गावडे

प्रशासनाची लोकाभिमुख भूमिका; तांत्रिक त्रुटी तत्काळ दूर करून सर्वांना न्याय


चंदगड : प्रतिनिधी

सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंमलबजावणीत चंदगड तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. निराधार, वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना तातडीने आधार मिळावा या उद्देशाने तालुका समितीने घेतलेल्या निर्णयामुळे एकाच दिवशी तब्बल ६२० अर्जांना मंजुरी देत ‘शंभर टक्के निकाल’ साध्य करण्यात आला आहे.

चंदगड तहसील कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत प्राप्त सर्व अर्जांची काटेकोर छाननी करण्यात आली. अनेक अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या; मात्र त्या तत्काळ दूर करून पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्यावर भर देण्यात आला. परिणामी, एकही अर्ज प्रलंबित न ठेवता सर्व अर्जांना मंजुरी देण्यात आली, ही बाब विशेष ठरली.

या ऐतिहासिक निर्णयामुळे ६२० कुटुंबांना शासकीय आर्थिक सहाय्याचा लाभ मिळणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग आणि निराधार घटकांसाठी हा निर्णय आशादायी ठरत आहे.

दरम्यान, या योजनेअंतर्गत झालेल्या बैठकींचा आढावा घेतला असता, पहिल्या बैठकीत ३१४, दुसऱ्या बैठकीत ३२३ आणि तिसऱ्या बैठकीत ६२० अशा एकूण १,२५७ अर्जांना आतापर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. ही आकडेवारी प्रशासनाच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारी ठरत आहे.

समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी सांगितले की, “शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. केवळ कागदपत्रांतील त्रुटींमुळे कोणताही गरजू वंचित राहू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना न्याय देता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

या प्रक्रियेत तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार किल्लेदार, शितल कट्टी, सुरेश कांबळे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच समिती सदस्य महादेव सांबरेकर, ज्योतिबा गोरल, भरमु पाटील, लक्ष्मी जाधव, हुसेनकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत निर्णय प्रक्रियेला गती दिली.

या निर्णयानंतर लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून ‘आता सरकारी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज उरली नाही’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाच्या या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे चंदगड तालुक्यात सकारात्मक बदलाची नवी दिशा निर्माण झाली असून इतर तालुक्यांसाठीही हा आदर्श ठरत आहे.

No comments:

Post a Comment