'स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा यंदा ७ जून रोजी, ३ हजार स्पर्धकांचा सहभाग, तीन दिवसीय कार्यक्रमात ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2026

'स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा यंदा ७ जून रोजी, ३ हजार स्पर्धकांचा सहभाग, तीन दिवसीय कार्यक्रमात ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

 


चंदगड : श्रीकांत पाटील/ सी एल वृत्तसेवा 

  जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगड वर दरवर्षी होणारी मॅरेथॉन स्पर्धा यंदा 'स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन' नावाने ओळखली जाणार आहे. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा यंदा रविवार दि. ७ जून २०२६ रोजी होत आहे. यानिमित्त गडावर तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर 'निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी निसर्गाचे रक्षक मोहिमेंतर्गत निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांच्या प्रबोधना बरोबरच क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जनजागृती निर्माण व्हावी, महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा. या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. 

   ही  मॅरेथॉन स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी एक आव्हान ठरली आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला व सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून धावण्याचा रोमांचकारी अनुभव घेण्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, बेळगाव, बेंगलोर, पणजी, लखनऊ, कलकत्ता सह देशाच्या कानाकोपऱ्यातून धाडसी मॅरेथॉन पटूंची या स्पर्धेसाठी गर्दी होत आहे. गतवर्षी या स्पर्धेत देशभरातील तब्बल १२५० पुरुष व महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावर्षी  ३ हजार पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

     यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून स्पर्धा ‘जॉय ऑफ जंगल’ ५ किमी. ‘जंगल ड्रीम रन’ १० किमी व ‘जंगल हाफ मॅरेथॉन’ २१ किमी अशा तीन श्रेणीमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र श्रेणीमध्ये असेल. स्पर्धेतील ५ किलोमीटर श्रेणीमध्ये  वयोगट १२ ते १४, १५ ते १८ व १९ ते ३९ वरिष्ठ/खुला गट. १० किलोमीटर धावणे स्पर्धेत वयोगट १६ ते १८, १९ ते ३९ व ४० वर्षांवरील सीनियर / मास्टर. २१ किलोमीटर धावणे मध्ये सीनियर ओपन १८ ते ३९ वयोगट, सीनियर/ मास्टर ४० ते ४९ वयोगट व ५९ वर्षांवरील ज्येष्ठ/ सुपर असे १८ गट केले असून स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. 

   स्पर्धेच्या निमित्ताने दिनांक ५ ते ७ जून असे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी ७ ते १० किल्ले परगड परिसरात ध्वजसंचलन, एनसीसी, एनएसएस व विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लॅस्टिक मुक्त अभियान, पर्यावरण जनजागृती सत्र.  ६ रोजी इतिहास व सांस्कृतिक दिनानिमित्त मजरे कार्वे ग्रामस्थ नियोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळा व  पारंपारिक मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम,  कोअर हेरिटेज संस्थेमार्फत राकेशराव धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शन' होणार असून हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे.  दि. ७ रोजी सकाळी पाच वाजता स्पर्धकांचे आगमन, ६.०० वाजता उद्घाटन होणार असून ७ वाजता २१ किमी, ७.३० वाजता १० किमी व ८ वाजता ५ किमी अशा क्रमाने स्पर्धकांना सोडले जाईल. साडेदहा वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन व बक्षीस वितरण  कार्यक्रम होणार आहे.

  या स्पर्धेसाठी मुख्य प्रयोजक स्टॉफ इंडिया, सहप्रयोजक आमदार शिवाजीराव पाटील, सहभागी भागीदार माजी आमदार राजेश पाटील, किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एलएलपी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन, रूपसंगम क्लॉथ स्टोअर, खानापूर को-ऑपरेटिव बँक, लता फाउंडेशन, हॉटेल प्रणाम, पंचायत समिती चंदगड, महाराष्ट्र वन विभाग, मा फाउंडेशन, फिट इंडिया, महाराष्ट्र पोलीस, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, एसटी महामंडळ व चंदगड तालुका पत्रकार संघ यांचे सहकार्य लाभले आहे.

  यावेळी स्टॉफ इंडिया चे सीईओ बिपिन चिरमुरे, आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील विविध शासकीय अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथे होणार असून स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, ग्लुकोज आदी सुविधा उपलब्ध असतील. सहभागी सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र, आकर्षक पदक, फळझाडाचे रोपटे, टी-शर्ट तर विजेत्यांना रोख बक्षीसे दिली जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असून ऑनलाइन नोंदणी व अधिक माहितीसाठी https://www.pargad.in या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन  स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे  व सल्लागार समिती सदस्य पत्रकार श्रीकांत पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment