“तंत्रज्ञानाचा वेग, बदलते पर्यावरण आणि युद्धजन्य स्थितीतही मानवता जपा!” – प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांचा प्रभावी संदेश - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2026

“तंत्रज्ञानाचा वेग, बदलते पर्यावरण आणि युद्धजन्य स्थितीतही मानवता जपा!” – प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांचा प्रभावी संदेश

चंदगड (प्रतिनिधी)

 – येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात “Exploring New Dimensions in Social Science, Humanities, Commerce, Management and Sciences” या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय, ऑनलाइन परीषदेत अत्यंत दिमाखदार वातावरणात, शैक्षणिक उत्साह आणि बौद्धिक उंचीच्या साक्षीने पार पडले. ज्ञान, संशोधन आणि नव्या विचारांची देवाणघेवाण घडवून आणणाऱ्या या परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि संशोधकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या परिषदेचे बीजभाषक अमेरिकेतील सालेसबरी विद्यापीठाचे प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी आपल्या प्रभावी, विचारप्रवर्तक आणि दूरदृष्टीपूर्ण भाषणातून संपूर्ण परिषदेचा केंद्रबिंदूच निर्माण केला. त्यांनी अत्यंत ठामपणे मांडले की, “आजचा काळ हा वेगवान तंत्रज्ञानाचा, बदलत्या पर्यावरणाचा आणि जागतिक अस्थिरतेचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगतीची नवी दारे उघडली असली, तरी त्याच वेळी पर्यावरणीय संकटे, सामाजिक विषमता आणि युद्धजन्य परिस्थिती मानवजातीसमोर मोठे आव्हान बनून उभी आहेत.”

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थ्याने केवळ तांत्रिक प्रगतीकडे पाहून चालणार नाही, तर त्या प्रगतीचा मानवजातीवर होणारा परिणामही समजून घेतला पाहिजे. आजच्या जागतिक परिस्थितीत शांतता, सहअस्तित्व, सर्वसमावेशकता आणि मानवी मूल्ये जपणे हीच खरी जबाबदारी आहे.”

“ज्ञान हे केवळ करिअरसाठी नसून समाजकल्याणासाठी असावे,” असा संदेश देत त्यांनी संशोधनात सामाजिक बांधिलकी, नैतिकता आणि संवेदनशीलता जपण्याचे आवाहन केले. त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित संशोधकांना नवी दिशा मिळाली.

परिषदेचे उद्घाटन खेडूत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील यांच्या हस्ते झाले.  प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविकातून परिषदेचा हेतू, विषयाची व्यापकता आणि संशोधनाची गरज प्रभावीपणे मांडली. पहिल्या सत्राचे आभार समन्वयक डॉ. आर. एन. साळुंखे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. एम. एम. माने यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.

दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्वानांनीही आपले विचार मांडले. श्रीलंकेतील कल्याणी विद्यापीठाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. लाल मरवीन धर्मश्री यांनी जागतिक भौगोलिक बदलांचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम अधोरेखित केले. इस्रायलमधील इंडियन कल्चरल अँड हेरिटेज व्हर्जिन विद्यापीठाचे प्रा. रवीका बेंजामीन यांनी भारतीय आणि इस्रायली संस्कृतीतील साम्यस्थळे उलगडत सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर धागा जोडला.

यावेळी गुजरातमधील अग्रवाल कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे डॉ. ज्ञानेश्वर पांडे, ओरिसातील इंडियन फॉरेस्ट हिस्टरी फॅकल्टी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरचे प्रा. डॉ. संदीप राऊत, गोवा विद्यापीठाचे डॉ. डी. एम. जकाते, शिमोगा येथील प्राचार्य डॉ. एम. एस. प्रशांत तसेच बांगलादेशातील कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे प्रा. डॉ. लिटॉन प्रासोद मावलीया यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक विचारांनी परिषद समृद्ध केली.

या परिषदेत अध्यक्ष खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक व माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात अशा बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदांचे संशोधनवृद्धी, ज्ञानविस्तार आणि जागतिक संवादासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले.

परिषदेत एकूण ९६ संशोधन निबंध सादर करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या डॉ. राजश्री बारवेकर, माडखोलकर कॉलेज चंदगडचे डॉ. विठोबा पाटील, गारगोटी कॉलेजचे डॉ. एस. एम. पाटील आदी संशोधकांनी आपल्या संशोधनातून परिषदेला बौद्धिक समृद्धी दिली.

यावेळी खेडूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. जी. एस. पाटील, उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार अनंत सुतार, संचालक रामाना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ. एन. एस. मासाळ यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. के. एन. निकम, डॉ एन. के. पाटील, डॉ. एम. एम. माने, एस. एन. पाटील, डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. आर. के. तेलगोटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेत तब्बल ३४७ हून अधिक अभ्यासकांनी सहभाग नोंदवून ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा एक नवा आदर्श निर्माण केला.

एकूणच, आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक बदल आणि मानवी मूल्यांचा समतोल साधण्याचा संदेश देणारे हि बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरले.

No comments:

Post a Comment