सातत्याने होणारा वन्य प्राण्यांचा उपद्रव : चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली शिष्टमंडळासमवेत वनमंत्र्यांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2026

सातत्याने होणारा वन्य प्राण्यांचा उपद्रव : चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली शिष्टमंडळासमवेत वनमंत्र्यांची भेट

 

चर्चेनंतर वन मंत्र्यांना निवेदन देताना आमदार शिवाजीराव पाटील व तालुक्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ

चंदगड  : सी एल वृत्तसेवा

  कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघ क्षेत्र डोंगर व जंगलाने व्यापलेला आहे. या जंगल परिसराच्या जवळपास असलेल्या शेतीचे गवे, रानडुक्कर अशा वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान सुरू आहे. यामुळे शेतकरी व जंगल परिसर नजीकच्या ग्रामस्थांतून आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याविषयी मागणी वाढत होती. अनेक गावांतून डुकरांना मारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ही जोर धरू लागली आहे. त्या अनुषंगाने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आज 8 जुलै 2025 रोजी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन वन्य प्राण्यांच्या उपद्रवाबाबत चर्चा केली.  वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत मागणी केली. या बैठकीदरम्यान पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली.

 १) जंगल शेजारी लागून असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी वनविभागाने खंडाने घ्याव्यात व दरवर्षी हेक्टरी 1 लाख अनुदान द्यावे. २) शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत. ३) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाजारभावाने होणारी नुकसानभरपाई 15 दिवसांच्या आत मिळावी. ४) हत्ती, रानगवे, अस्वले, बिबटे, रानडुक्कर, कोल्हे, मोर, माकड या सगळ्या प्रकारचे वन्यप्राणी मालकी हद्दीत येणार नाहीत याची दखल वनविभागाने घ्यावी. ५) जंगलाशेजारी सर्व शेतकऱ्यांना मोफत सौर कुंपण तातडीने देण्यात यावेत. एकाच गट नंबरात जितक्या वेळी नुकसान करतील तितक्या वेळी नुकसान भरपाई मिळावी. ६) रानडुकरांना मारण्याची परवानगी देण्यात यावी. ७) जंगलातच वन्यप्राण्यांच्या चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून ते शेतकऱ्यांच्या मालकीत येणार नाहीत. ८) वन्यप्राणी उपद्रवाबाबत तालुक्यातील काही तज्ञ शेतकरी व वनविभागाचे अधिकारी यांची समिती गठीत करून दरमहा सहविचार सभा घेण्यात यावी.  आदी मुद्द्यांचा समावेश होता.

  आमदार  शिवाजीराव पाटील यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्यावर सविस्तर चर्चा करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्याचे समजते.

   या शिष्टमंडळात आमदारांसोबत चंदगड मधून लक्ष्मण गावडे, दिग्विजय देसाई, डी. एल. भादवणकर, सट्टुपा पेडणेकर, रघुवीर खंडोजी शेलार, सुरेश हरेर, कृष्णा पाटील, सदानंद गावडे, जोतिबा तेजम, मच्छिंद्र नावळे, उत्तम भादवणकर, प्रकाश गावडे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment