शक्तीपीठ महामार्ग रद्द व इतर मागण्यांसाठी किरण कोले यांचे कालकुंद्री येथे चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2026

शक्तीपीठ महामार्ग रद्द व इतर मागण्यांसाठी किरण कोले यांचे कालकुंद्री येथे चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील उदयोन्मुख सामाजिक कार्यकर्ते किरण कल्लाप्पा कोले यांनी विविध सामाजिक मागण्यांसाठी १ मे २०२६ महाराष्ट्र दिन पासून ग्रामपंचायत कालकुंद्री समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज चौथ्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरूच होते. 

   तहसीलदार चंदगड यांना दिलेल्या निवेदनात एसटी महामंडळ व महावितरण कंपनीचे शासनात विलीनीकरण करून रिक्त पदावर तरुणांची भरती करावी, आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा द्यावी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मधील भ्रष्टाचार थांबवून गोवा सरकार प्रमाणे संपूर्ण मोफत आरोग्य सेवा द्यावी, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ताम्रपर्णी नदीवरील कुदनूर - दुंडगे पूल नवीन बांधावा, चंदगड तालुक्यातील कामेवाडी कल्याणपुर येथील आदिवासींना महादेव कोळी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत. चंदगड मधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा. यासह स्थानिक मागण्यांचा समावेश आहे. उपोषण स्थळी चंदगडचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोवाड दुरुक्षेत्र चे पोलीस अधिकारी व कालकुंद्री चे पोलीस पाटील लक्ष ठेवून आहेत.

No comments:

Post a Comment