चंदगड कृषी विभाग : मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, अर्ज करण्याची हि आहे अंतिम तारीख? - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2026

चंदगड कृषी विभाग : मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, अर्ज करण्याची हि आहे अंतिम तारीख?

चंदगड / प्रतिनिधी

    कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषि विभागाने ‘मागेल त्याला काजू कलमे’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (PM-RKVY) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी ही योजना राबविण्यात येत असून, १० मे ते १९ मे दरम्यान महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

    जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच प्रकल्प संचालक, आत्मा, कोल्हापूर यांच्या माध्यमातून राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

    कृषि विभागाच्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या पश्चिम भागातील डोंगराळ हवामान आणि जमीन काजू लागवडीसाठी अत्यंत अनुकूल असल्याने काजू पीक शेतकऱ्यांसाठी ‘पांढरे सोने’ ठरत आहे. कमी पाण्यात आणि उताराच्या जमिनीतही येणारे हे पीक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर घालत आहे.

    काजू पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग, प्रतवारी आणि पॅकेजिंग युनिट्समुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होत असून, महिलांना व तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच, कोल्हापूरातील दर्जेदार काजूला देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.

    पर्यावरणाच्या दृष्टीनेही काजू लागवड फायदेशीर ठरत असून, डोंगराळ भागातील जमिनीची धूप रोखण्यासाठी व वृक्षारोपण वाढवण्यासाठी या पिकाची मदत होत आहे.

    या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शासकीय रोपवाटिकेतून प्रति शेतकरी कमाल ५० उच्च उत्पादन देणारी मोफत काजू कलमे दिली जाणार आहेत. यासाठी किमान ०.०५ हेक्टर ते कमाल ०.२५ हेक्टर क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच १० ते ५० कलमे मोफत मिळणार आहेत.

    योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ उतारा, ८ अ उतारा, फार्मर आयडी, आधारकार्ड आणि अर्ज आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरून करावी लागणार आहे.

    कृषि विभागाने पात्र शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी बीटीएम, एटीएम, गावातील सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment