राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती: 'तपासा, स्वच्छ करा, झाका' या त्रिसूत्रीवर भर - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2026

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती: 'तपासा, स्वच्छ करा, झाका' या त्रिसूत्रीवर भर


चंदगड, दि. १६ मे: 

    आरोग्य विभागामार्फत आज १६ मे रोजी 'राष्ट्रीय डेंग्यू दिन' संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला. यावर्षीची थीम "डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग: तपासा, स्वच्छ करा आणि झाका" (Community participation dengue control: check, clean and cover) ही असून नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय डेंग्यू नियंत्रण अशक्य असल्याचा संदेश देण्यात आला.

    तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व तालुका सार्वजनिक आरोग्य केंद्र(BPHU), पंचायत समिती चंदगड यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात "डेंग्यू रोखण्यासाठी आपणच जबाबदार! स्वच्छता ठेवा – डासांना थारा देऊ नका!" असे आवाहन करण्यात आले आहे.

    डेंग्यू आजाराबाबत माहिती डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा आजार असून तो 'एडिस एजिप्ती' या डासामार्फत पसरतो. हा डास स्वच्छ साठलेल्या पाण्यात वाढतो आणि प्रामुख्याने दिवसा चावतो. संक्रमित व्यक्तीला चावलेला डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास आजार पसरतो. डेंग्यू व्यक्तीकडून व्यक्तीला थेट पसरत नाही.

    लक्षणे व उपचार अचानक तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, सांधे व स्नायू दुखणे, अंगावर लाल पुरळ, मळमळ किंवा उलटी, अशक्तपणा, नाकातून किंवा हिरड्यातून रक्त येणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत.

    डेंग्यू झाल्यास भरपूर पाणी, ओआरएस, नारळपाणी, सूप घ्यावे. स्वतःहून औषधोपचार करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. Aspirin किंवा Ibuprofen टाळावे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

    प्रतिबंधासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आरोग्य विभागाने नागरिकांना खालील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. 

1. पाणी साचू देऊ नका: कुलर, टाक्या, बादल्या, कुंड्या नियमित स्वच्छ ठेवा.

2. 'कोरडा दिवस' पाळा: आठवड्यातून एकदा सर्व भांडी रिकामी करून कोरडी करा.

3. झाका व संरक्षण करा: पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा, खिडक्यांना जाळी लावा, मच्छरदाणी वापरा.

4. परिसर स्वच्छ ठेवा: घर व परिसरातील साचलेले पाणी काढून टाका.

5. ताप आल्यास त्वरित तपासणी: ताप आल्यास दुर्लक्ष न करता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करून घ्या.


    इतर कीटकजन्य आजारांपासून सावध मलेरिया Anopheles डासामुळे, चिकुनगुनिया व झिका व्हायरस Aedes डासामुळे, तर हत्तीरोग Culex डासामुळे पसरतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या डासांपासून संरक्षण आवश्यक आहे.

    "डेंग्यूमुक्त भारत, निरोगी भारत" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी "डेंग्यूमुक्त समाजाची हीच गुरुकिल्ली!" असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. "स्वच्छता ठेवा, डेंग्यू दूर ठेवा. डेंग्यू रोखण आपल्या हातात आहे." असा संदेश डॉ बी डी सोमजाळ तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती चंदगड यांनी दिला आहे.

    अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment