चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील रिक्त शिक्षक पदे भरण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2026

चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील रिक्त शिक्षक पदे भरण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर / प्रतिनिधी

चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या तिन्ही तालुक्यांतील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षण विभागातील इतर रिक्त पदे भरण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर असलेली कमतरता शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची गंभीर बाब त्यांनी सातत्याने मांडली होती.

यावेळी आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शिक्षकच नसतील तर माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील मुले शिकणार कशी? विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शासनाने आता तरी ठोस पावले उचलली पाहिजेत.”

त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment