चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड वन विभाग अंतर्गत कानूर खुर्द परिसरात दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या वन्यजीव शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी शब्बीर दस्तगीर जमादार रा. दानोळी हा घटना घडल्यापासून फरार होता. वन विभागाने केलेल्या निर्णयात कारवाईत त्यास अटक केली असून चंदगड न्यायालयाने त्याला चार दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात एकूण आठ आरोपी अटक करण्यात आली होती. यात तुकाराम अमृसकर, रा. कानूर खुर्द, रियाज जमादार, रा. दानोळी, अमीन मुजावर, रा. रुकडी, दिगंबर अनगुडे, रा. कानूर खुर्द, इर्शाद नदाफ, रा. दानोळी, दाऊद नदाफ, रा. दानोळी, अन्वर पटेल, रा. दानोळी, यासिन उर्फ बबलू नदाफ, रा. दानोळी यांचा समावेश असून ते सध्या जामिनावर आहेत. तथापि मुख्य सूत्रधार आरोपी शब्बीर दस्तगीर जमादार हा फरार होता. त्याने गडहिंग्लज कोर्टात अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता तो न्यायालयाने 23 जानेवारी 2026 रोजी फेटाळला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाकडे मागितलेला जामीनही वन विभागाकडून कोर्टात सादर केलेल्या ठोस पुराव्यामुळे फेटाळून लावण्यात आला.
या प्रकरणात प्राधिकृत अधिकारी विलास काळे (सहाय्यक वनसंरक्षक, कोल्हापूर), चौकशी अधिकारी तुषार गायकवाड (वनक्षेत्रपाल, चंदगड) व चंद्रकांत पावस्कर (वनपाल, कानूर खुर्द) यांनी आरोपीच्या ताब्यातील गुन्ह्यासंदर्भातील छायाचित्रे, मोबाईल CDR, तांत्रिक पुरावे तसेच इतर महत्वपूर्ण माहिती न्यायालयास सादर केली. गुन्हा घडला त्या वेळी आरोपी जमादार हा रेनॉल्ट डस्टर या वाहनात धारदार व टोकदार हत्यारांसह आढळला होता. वनविभागाने ही सर्व हत्यारे जप्त केली आहेत. आरोपीच्या जप्त केलेल्या मोबाईल मध्ये वन्य प्राण्यांचे आक्षेपार्ह छायाचित्रे तसेच वन्यजीव शिकार व हालचालींसाठी वापरण्यात येणारे व्हॉट्सॲप ग्रुप देखील आढळून आले आहेत. या ग्रुपमध्ये काही प्रतिष्ठित व्यक्ती, हॉटेल व्यावसायिक तसेच इतर सदस्यांचा सहभाग असल्याचे समजते.
सर्वच न्यायालयांनी अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आरोपी जमादार हा दि. 06/05/2026 रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय, चंदगड येथे हजर झाला असता त्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आली. त्याला चंदगड न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची वनकोठडी दिली आहे.
सदर गुन्ह्यातील आणखी एक फरार आरोपी लखन हेगडे, रा. माणगाववाडी याचा शोध सुरू असून वनविभागाचे तपास पथक त्याच्या मागावर आहे. पुढील तपास धैर्यशील पाटील (उपवनसंरक्षक, कोल्हापूर) व श्री. विलास काळे (सहाय्यक वनसंरक्षक, कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार गायकवाड (वनक्षेत्रपाल, चंदगड), चंद्रकांत पावस्कर (वनपाल, कानूर खुर्द) व विकास राऊत (वनरक्षक, पिळणी) हे करीत आहेत.
वन्यजीव शिकार, अवैध वृक्षतोड, जंगलातील अतिक्रमण अथवा वनसंपत्तीशी संबंधित कोणतीही बेकायदेशीर बाब आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन परीक्षेत्र वनअधिकारी चंदगड यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment