विज्ञाननिष्ठ शिक्षक भूषण पाटील यांचे आकस्मिक निधन; शिक्षण क्षेत्रावर शोककळा - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2026

विज्ञाननिष्ठ शिक्षक भूषण पाटील यांचे आकस्मिक निधन; शिक्षण क्षेत्रावर शोककळा

 


चंदगड / प्रतिनिधी

दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील विज्ञान विषयाचे अभ्यासू, विद्यार्थीप्रिय व समर्पित सहाय्यक शिक्षक स्वर्गीय भूषण अशोकराव पाटील (शिवनगे) यांच्या आकस्मिक निधनाने चंदगड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

“शिक्षक कधीच मरत नसतात… ते आपल्या विचारांत, संस्कारांत आणि विद्यार्थ्यांच्या यशात कायम जिवंत राहतात,” या शब्दांची प्रचिती देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भूषण पाटील होते. मनमिळावू स्वभाव, विज्ञाननिष्ठ विचारसरणी, अध्यापनातील तळमळ आणि विद्यार्थ्यांवरील अपार प्रेम यामुळे त्यांनी अल्पावधीतच सर्वांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.

चंदगड तालुक्याचे पहिले आमदार कै. नरसिंगराव भुंजगराव पाटील यांचे ते नातू होत. सामाजिक व शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभलेल्या भूषण पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले. विज्ञान विषयाची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयोगशील अध्यापन पद्धतीचा अवलंब केला होता.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनापर्यंत मजल मारत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. विज्ञान विषय केवळ पुस्तकापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच प्रेरणादायी ठरला.

त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राने एक कर्तव्यदक्ष, पुरोगामी, अभ्यासू आणि हरहुन्नरी शिक्षक गमावला आहे. विद्यार्थ्यांसाठीची त्यांची तळमळ, सहकाऱ्यांशी असलेले आत्मीय संबंध आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, मुलगी आणि मोठा परिवार असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment