चंदगड : सी एल वृत्तसेवा
सौ. गीतांजली धोंडीराम पाटील यांनी हॉंगकॉंग येथे दि. ९ व १० मे २०२६ रोजी झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक पटकावले. ६५ वर्षावरील गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना अशाप्रकारे यश मिळवणारी जिल्ह्यातील पहिलीच महिला असावी. बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) सध्या रा. गडहिंग्लज येथील सौ गीतांजली या योग विद्याधाम गडहिंग्लज च्या साधिका आहेत.
पाच गटात करण्यात आलेल्या या स्पर्धा हाँगकाँग येथील इंडियन क्लब मध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेत जगातील दहा देशांचे योग स्पर्धक सहभागी झाले होते.
चंदगड तालुक्यातील निट्टूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या गीतांजली पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर योग साधना करत मोठे यश संपादन केले आहे. या कामी त्यांना डॉ. संजय चौगुले, शालन पाटील यांचे मार्गदर्शन तर योग संस्थेचे अध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सदानंद वाली, बाबुराव खोत, गुरुलिंग खंदारे, शंकर खाडे, बाळासाहेब बडदारे, विठ्ठल मोरे आदींचे सहकार्य लाभले.
जागतिक स्पर्धेत जाण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्हा योग्य स्पर्धेत ६५ वर्षांवरील वयोगटात प्रथम क्रमांक, महाराष्ट्र योग शिक्षक संघ आयोजित स्पर्धेत तृतीय क्रमांक, महाराष्ट्र स्टेट असोसिएशन कोल्हापूर आयोजित ५० वर्षांवरील वयोगट स्पर्धेत प्रथम क्रमांक, महाराष्ट्र स्टेट असोसिएशन च्या वतीने कल्याण येथील ६५ वर्षे वरील वयोगटात चौथा क्रमांक, नॅशनल योगासन स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ६५ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला होता. शिवजयंती निमित्त मुंबई विभागाच्या वतीने मुंबई येथे भरवण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेतही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले होते.
हॉंगकॉंग येथील आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेतील यशामुळे गडहिंग्लज तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यानिमित्ताने विविध खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांंसमोर त्यांनी एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

No comments:
Post a Comment