कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. तथापि या योजनांची माहिती माजी सैनिक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने ते लाभांपासून वंचित राहतात. या योजनांचा लाभ माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना पर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावच्या माजी सैनिक संघटना पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन चंदगड तालुका आजी- माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार मेजर निवृत्ती लक्ष्मण मसूरकर (माडवळे) यांनी केले. ते कालकुंद्री (ता. चंदगड) येथे नव्याने बांधलेल्या सैनिक भवनच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर किरण हनमंत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कालकुंद्री गावचे १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील शहीद जवान परशराम सट्टूप्पा पाटील, सन १९६८ मध्ये उत्तराखंड मनाली येथील विमान अपघातात शहीद झालेले विठोबा नागोजी पाटील, व सन १९९५ मध्ये जम्मू कश्मीर येथे युद्धसरावावेळी वीरगती प्राप्त झालेले गोपाळ हनमंत पाटील यांच्या फोटोंचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कालकुंद्री सैनिक संघटना अध्यक्ष शरद जोशी यांनी केले. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील म्हणाल्या आजी माजी सैनिक संघटना सभासदांची वर्गणी व ग्रामस्थांच्या देणगीतून भव्य अशी वास्तू या ठिकाणी उभारले. याचा उपयोग शाळा, कॉलेजचे विद्यार्थी व गावातील तरुणांना मार्गदर्शनासाठी करून जास्तीत जास्त संख्येने तरुण आर्मी मध्ये भरती होतील यासाठी प्रयत्न झाल्यास या सैनिक भवन चे महत्व वाढेल. अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मेजर किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, भारती जाधव, संघटनेचे माजी अध्यक्ष विष्णू पाटील, ठेकेदार चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, संजीव पाटील (दुंडगे), मोनिका क्रूज आदींनी मनोगते व्यक्त केली.
नेव्ही असोसिएशन बेळगावचे अध्यक्ष अशोक कल्लाप्पा पाटील (कालकुंद्री) यांच्या देणगीतून उभारण्यात येणाऱ्या कमानी चे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी पंस. सदस्य मधुकर आंबेवाडकर, उपसरपंच संभाजी पाटील, ग्राम पं. सदस्य प्रशांत मुतकेकर, लक्ष्मण वै. भिंगुडे (तेऊरवाडी) सेवा सोसायटी चेअरमन अशोक रामू पाटील, विनोद पाटील, एल. एस. पाटील, पोलीस पाटील संगीता कोळी, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष मनोहर बाळू पाटील, श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह कमिटी अध्यक्ष शंकर वैजनाथ पाटील, डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारणी सदस्य पत्रकार श्रीकांत पाटील, सुखदेव भातकांडे, भरत पाटील, संजय पाटील, संघटना उपाध्यक्ष सुरेश पाटील सचिव उदय मुतकेकर व शहीद जवानांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक कांबळे व युवराज पाटील यांनी केले. विजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध गावच्या आजी माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment