कोल्हापूर, प्रतिनिधी :
चंदगड विधानसभा मतदारसंघातील सिंचन, पिण्याचे पाणी, पूर नियंत्रण, नदीपात्रातील गाळ, जलसाठा, पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शिवाजीराव श. पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन विविध विकासकामांसाठी निधी व प्रशासकीय मंजुरीची मागणी केली.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे तसेच मुख्य अभियंता (जलसंपदा) कार्यालय, कोल्हापूर यांच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी चंदगडसह गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न मंत्रीमहोदयांसमोर मांडले. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मंत्री डॉ. विखे-पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
बैठकीत ताम्रपर्णी व घटप्रभा नदीपात्रातील साचलेला गाळ तातडीने काढण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी नवीन साठवण तलाव उभारणे आणि घटप्रभा नदीतून उपसा सिंचन अथवा पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणीही करण्यात आली.
चंदगड तालुक्यातील वाघोत्रे, नामखोल, इसापूर, पारगड आणि मिरवेल परिसरात नवीन साठवण तलाव उभारण्यासाठी मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली. तिलारी प्रकल्प परिसरात मत्स्य व्यवसाय व पर्यटनाला चालना मिळावी यासाठी बोटींगला परवानगी देऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
सुंडी तलावाच्या प्रलंबित कामास तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच अतिवृष्टीमुळे दरवर्षी होणारे पूर, भूस्खलन, नदीकाठची धूप, संरक्षण भिंती आणि इतर आपत्कालीन कामांसाठी विशेष निधी मंजूर करण्याची विनंतीही आमदार पाटील यांनी केली.
याशिवाय चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील जीर्ण झालेल्या अनेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावर जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर, खासदार धनंजय महाडीक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, मुख्य अभियंता (जलसंपदा) अलका अहिरराव तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, "चंदगड विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, नागरिक आणि युवकांच्या हिताशी संबंधित जलसंपदा प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून प्रलंबित कामांना लवकरात लवकर मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील."

No comments:
Post a Comment