![]() |
| पायी मशाल दौड मोहिमेचा प्रारंभ करताना मान्यवर |
थेट आग्रा येथून : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी औरंगजेबाच्या पोलादी पहारा असलेल्या नजरकैदेतून दुर्दम्य इच्छाशक्ती, साहस, संयम व बुद्धि चातुर्याच्या बळावर आपली व युवराज संभाजीराजे यांची सही सलामत सुटका करून घेतली. जागतिक इतिहासातील या आश्चर्यजनक घटनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात ‘शिव चातुर्य दिवस’ आनंद दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारचे विपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली.
![]() |
| मशाल घेऊन धावताना महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्री जयकुमार रावल व भरतशेठ गोगावले |
या घटनेच्या स्मरणार्थ आग्रा येथून राजगडापर्यंत १३१० किलोमीटरची ‘गरुडझेप मोहिम’ यंदाही आयोजित करण्यात आली. आग्रा किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महाराष्ट्रातील विविध किल्ल्यावरून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करून सोमवारी १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी मोहिमेला प्रारंभ झाला. यात महाराष्ट्र व देशभरातील सुमारे एक हजार धावपटू आणि १०० सायकलपटू सहभागी झाले. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री ना. जयकुमार रावल, ना. भरत गोगावले, उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय, गरुड झेप मोहीम चे संस्थापक अध्यक्ष व छत्रपतींचे सरसेनापती सरनौबत पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज मारुती उर्फ आबासाहेब गोळे (पुणे), डॉ. वात्सल्य उपाध्याय (अध्यक्ष छ. शिवराय प्रतिष्ठान आग्रा) यांच्या हस्ते जलाभिषेक करून दौड मोहीमेची सुरुवात झाली. चार राज्यांतील ७८ शहरांतून ही मोहीम राजगडाकडे मार्गक्रमण करणार असून २७ ऑगस्ट रोजी राजगडावर पोहोचणार आहे.
![]() |
| आग्रा ते राजगड सायकल मोहिमेत सहभागी असंख्य सायकल पट्टूं सोबत ६५ वर्षावरील सायकलपट्टू पती पत्नी व इतर सायकलपट्टू |
रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी आग्रा कॉलेजच्या गंगाधर शास्त्री भवनात रविवारी समर्थ रामदास व छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, आग्रा आणि गरुडझेप मोहिमेच्या वतीने शिव चातुर्य दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोहिमेच्या पुस्तकाचे प्रकाशन तसेच पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र व गोव्यातून आलेल्या सुमारे १०० सदस्यांच्या पथकाने शिवरायांची आग्र्याहून सुटका हे नाट्य सादर केले. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनापतींच्या १४ व्या पिढीतील वंशजांचाही समावेश होता.
![]() |
| आग्रा कॉलेज येथे झालेल्या शिव चातुर्य दिन कार्यक्रमात बोलताना मंत्री भरत गोगावले |
उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी कोठी मीना बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा उभारण्यासह संग्रहालय व स्मारक विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले. हे संग्रहालय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
![]() |
| आग्रा कॉलेज येथील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शेकडो शिवभक्त |
रोजगार हमी व बागायती मंत्री भरतसेठ गोगावले यांनी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून त्यांना बंदी बनवले; मात्र महाराजांनी आपल्या युद्धकौशल्याने आणि कार्यक्षमतेने त्याला चकवा देत हिंदवी स्वराज्याच्या कार्याला पुढे नेले, असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र मधून आलेल्या कलाकारांनी प्राचीन युद्धकलेचे सादरीकरण केले. महिला कलाकारांनी तलवारबाजी व लाठीकलेचे प्रात्यक्षिक दाखवले. गोवा येथील ओमिडा डान्स अँड फिटनेस अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘शिव शौर्य’ या बहारदार नाटकाने कार्यक्रमाच्या ठिकाणी चैतन्य निर्माण केले. पुण्याचे संगीतकार विनायक सोनावणे यांनी हलगी वादनातून पारंपरिक कलेचा आविष्कार घडवला. सायली जोशी- गोडबोले यांनी ‘राष्ट्रमाता जिजाबाई’ या एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले.
गरुडझेप मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष व मोहिमेचे प्रणेते मारुती उर्फ आबा गोळे यांनी सांगितले की, सात वर्षांपूर्वी मोहिमेच्या पहिल्या वर्षी आग्रा ते राजगड प्रवास पूर्ण करण्यासाठी ३५ दिवस लागले होते. सन २०२० मध्ये एकट्याने सुरुवात केलेली केलेल्या मोहिमेत आज हजारो शिवप्रेमी मावळे सहभागी होत असून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश शासनाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. हा कार्यक्रम लोकोत्सव व्हावा ही आपली इच्छा आहे. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, चातुर्य, संयम व पराक्रम जगभरातील जनमानसात निरंतर स्मरणात राहील.
कार्यक्रमास जुन्नरचे शिवसेना प्रमुख योगेश बाबू पाटे, नीलेश गटणी, आग्रा कॉलेजचे प्राचार्य प्रा. सी. के. गौतम, डॉ. सिमरन उपाध्याय, पत्रकार विजय गोयल, के. के. भारद्वाज, दीप विनायक पटेल, गरुड झेप मोहीम गोवा प्रदेशाध्यक्ष राजाराम पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, राज्य पदाधिकारी संभाजी दहातोंडे पाटील, संतोष ननावरे, श्रीरंग बर्गे, राजेश घाणेकर, दिलीप धंदरे, मुंबई अध्यक्ष धोंडू कृष्णा जाधव, अविनाश राणे, बाळकृष्ण लाड, चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी श्रीकांत पाटील, संपत पाटील, चेतन शेरेगार, संदीप तारीहाळकर, शिवभक्त दीपक गावडे, सुखदेव भातकांडे, प्रकाश हेब्बाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवप्रेमींच्या राहण्याची व जेवणाची सोय येथील शिवभक्तांनी चांगल्या पद्धतीने करून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
थेट प्रक्षेपणाचा पहिला मान चंदगड तालुका पत्रकार संघाच्या सी एल न्यूज ला देण्यात आला
आग्रा येथे शिव चातुर्य दिनानिमित्त १६ व १७ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमांचे 'थेट प्रक्षेपण' चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित 'सी एल न्यूज' या पोर्टल चैनल वर करण्यात आले. त्याचा लाभ महाराष्ट्रासह देश विदेशातील हजारो शिवप्रेमी प्रेक्षकांनी घरबसल्या घेतला. ७ वर्षापासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याचा पहिला मान महाराष्ट्रातील शेवटच्या टोकाला असलेल्या चंदगड तालुक्यातील 'सी एल न्यूज' ला मिळाला.
'शिव चातुर्य -दिन गरुड झेप मोहीम' पंढरपूरच्या वारीचे रूप धारण करेल..! -ना. जयकुमार रावल
आज आग्रा येथे पर्यटक येतात ते ताजमहाल पाहायला; पण येत्या काही वर्षात हेच पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचे येथील जागतिक दर्जाचे स्मारक पाहायला येतील. अशा पद्धतीचे स्मारक महाराष्ट्र व उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्यातून आम्ही उभारू. शिव चातुर्य दिन व गरुड झेप मोहिमेत एक दिवस पंढरपूर वारी सारखे लाखो शिवभक्त सहभागी होतील. असे नियोजन करू अशी ग्वाही यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. यामुळे मोहिमेतील मावळ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.





No comments:
Post a Comment