![]() |
आग्रा येथील 'शिवचातुर्य दिन' कार्यक्रमासाठी 'जल कलश' घेऊन जाणाऱ्या पत्रकार व मावळ्यांना तहसीलदार यांच्याकडून शुभेच्छा
चंदगड : सी एल वृत्तसेवा |
आग्रा येथे शिवचरित्र चातुर्य दिन कार्यक्रमानिमित्त तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध किल्ल्यांवरून संकलित केलेल्या पवित्र पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पारगड, कलानिधीगड, गंधर्वगड, महिपाळगड, सह परिसरातील सामानगड, वल्लभगड, राजहंसगड व साखळी गड या ८ गडांवरील पाणी संकलित करण्यात आले. या जल कलश चे पूजन तसेच कलश घेऊन जाणाऱ्या पत्रकार व मावळ्यांसाठी शुभेच्छा कार्यक्रम तहसील कार्यालय चंदगड येथे पार पडला. यावेळी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले. याप्रसंगी आग्रा येथे रवाना होत असलेले पत्रकार श्रीकांत पाटील (कालकुंद्री), संपत पाटील व चेतन शेरेगार (चंदगड), संदीप तारीहाळकर (कागणी) तसेच दीपक गावडे (न्हावेली), सुखदेव भातकांडे (कालकुंद्री), प्रकाश हेब्बाळकर (कुदनूर), राजाराम पाटील (ढोलगरवाडी) आदींना तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, आगार व्यवस्थापक सतीश पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.
![]() |
| बेळगाव रेल्वे स्टेशन येथे शुभेच्छा देताना मान्यवर |
यावेळी बोलताना तहसीलदार राजेश चव्हाण यांनी हिंदवी स्वराज्यातील तब्बल चार किल्ले आपल्या चंदगड तालुक्यात आहेत. ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. मुघलांच्या बलाढ्य साम्राज्याच्या तत्कालीन आग्रा या राजधानीतून, औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्याला चकवा देत १७ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या असामान्य बुद्धिचातुर्याने आग्र्यातील नजरकैदेतून स्वतःसह युवराज छत्रपती संभाजी महाराज व सोबतच्या मावळ्यांची केलेली सुटका ही केवळ इतिहासातील एक घटना नाही; तर स्वराज्य निर्मितीच्या ध्येय पूर्तीसाठी केलेल्या धाडसाची, दूरदृष्टीची, नियोजनाची आणि अद्वितीय चातुर्याची जगाला थक्क करणारी गाथा आहे!
या ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण करून महाराजांच्या पराक्रमाला कृतीतून मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 'गरुडझेप' मोहीमेत चंदगडचे पत्रकार सहभागी होत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. पत्रकार व त्यांच्यासोबत जाणाऱ्या सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा अशा शुभेच्छा देऊन दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन तहसीलदार चव्हाण यांनी शेवटी केले.
उपस्थितांचे स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सावंत भोसले यांनी केले. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल धुपदाळे, पत्रकार संजय पाटील, माजी सैनिक शंकर कोले, शंकर पाटील, गणेश पुजारी, चंदगड वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसील कार्यालय चंदगड येथे आग्रा येथील जलाभिषेक साठी रवाना होत असलेल्या जल कलश ची पूजन करून व शुभेच्छा देताना तहसीलदार राजेश चव्हाण पत्रकार संघाचे पदाधिकारी व मान्यवर
आग्रा ते राजगड तब्बल १३१० कि.मी.चा ऐतिहासिक दौडीसाठी शुभेच्छा
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक देदीप्यमान कार्य, शिवचरित्राचा संदेश गावोगावी पोहोचवत आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, इतिहासप्रेम, साहस, शिस्त व स्वराज्यनिष्ठा जागृत करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ रोजी आग्रा ते (महाराजांची तत्कालीन राजधानी) राजगड पर्यंत १३१० किलोमीटर अंतराची पायी दौड व सायकल मोहीम राजगडाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड व तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
विविध गडावरील जल संकलन करण्यासाठी शिवप्रेमींचे सहकार्य
आठ गडांवरील जल संकलन करून पत्रकार संघाकडे पोहोच करण्यासाठी नारायण भोंगाळे, सुरेश रामचंद्र पाटील, गणपत दिनकर सावंत, रामलिंग जानबा तुपारे (महिपाळगड), गणपत पाटील (बाची) शिवभक्त विजय टेंबुगडे व संतोष गडकरी (चन्नेकुप्पी) व अखलाकभाई मुजावर (महागाव), शंकर विठोबा पाटील (कालकुंद्री), विठ्ठल राघोबा शिंदे (पारगड), भाऊसाहेब तरळेकर (वडगाव- बेळगाव),पद्माकर वाळुंज व अमित दळवी (साखळी- गोवा), अजित स्वामी (संकेश्वर) आदींचे सहकार्य लाभले.
शिवभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव रेल्वे स्टेशनवर शिवप्रेमींची उपस्थिती
गरुड झेप मोहीम अंतर्गत शिव चातुर्य दिन कार्यक्रमासाठी आग्रा येथे निघालेल्या चंदगड, बेळगाव व गोवा राज्यातील शिवभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव रेल्वे स्टेशनवर शिवसंत संजयजी मोरे, जानवी टुरिझम चे मालक राज चळवळेकर, सेवानिवृत्त अध्यापिका श्रद्धा संभाजीचे, अजय डेगस्कर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment