इब्राहिमपूर केंद्र शाळेत जागतिक हत्ती दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2026

इब्राहिमपूर केंद्र शाळेत जागतिक हत्ती दिन उत्साहात साजरा

चंदगड / प्रतिनिधी 

सामाजिक वनीकरण विभाग, चंदगड यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा, इब्राहिमपूर येथे जागतिक हत्ती दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि हत्तींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व पाऊसगीते सादर करून संगीतमय वातावरणात केली. विद्यार्थ्यांच्या आगळ्यावेगळ्या स्वागताने उपस्थित पाहुणे भारावून गेले. यावेळी शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हत्ती व निसर्ग संवर्धनाबाबत आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यापक विजय ढोणुक्षे यांनी केली. वन विभागाच्या वतीने वनपाल माणिक खोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वनक्षेत्रपाल व हत्ती अभ्यासक दत्ता पाटील यांनी हत्तींच्या सवयी, जीवनशैली, त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू तसेच हत्तींबाबतच्या गमतीजमती विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने सांगितल्या.

हत्तींच्या जीवनाचा अनोखा पट उलगडून सांगताना अध्यात्म, विज्ञान आणि निसर्ग यांचा सुंदर समन्वय त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. हत्तींच्या रंजक गोष्टी ऐकताना विद्यार्थी अक्षरशः तल्लीन झाले.

अध्यापक दत्ता गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास वनरक्षक अरुण सांगळे, वनसेवक पांडुरंग खापरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment