तिलारी धरणातील पाणी बेळगाव जिल्ह्यातील गावांना देण्याचा निर्णय स्थानिक जनतेला विश्वासात घेऊनच घ्यावा, चंदगडच्या पाणीहक्काला प्रथम प्राधान्य द्यावे; शिवसेना बांधकाम उद्योग सेनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2026

तिलारी धरणातील पाणी बेळगाव जिल्ह्यातील गावांना देण्याचा निर्णय स्थानिक जनतेला विश्वासात घेऊनच घ्यावा, चंदगडच्या पाणीहक्काला प्रथम प्राधान्य द्यावे; शिवसेना बांधकाम उद्योग सेनेची मागणी

 


चंदगड : प्रतिनिधी

    तिलारी धरणातील पाणी बेळगाव जिल्ह्यातील गावांना देण्याबाबत कोणताही निर्णय घेताना चंदगड तालुक्यातील स्थानिक जनता, शेतकरी व संबंधित नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. स्थानिक जनतेची मते जाणून न घेता असा निर्णय घेणे अन्यायकारक ठरेल, अशा आशयाचे निवेदन शिवसेना महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रताप ऊर्फ पिनू पाटील यांनी तहसिलदार राजेश चव्हाण यांना दिले आहे. 

पिनु पाटील

       तिलारी धरणाचा चंदगड तालुक्यातील जनतेशी थेट संबंध असून, धरणातील पाण्याचे नियोजन करताना स्थानिक नागरिकांच्या अडचणी, शेतीसाठीची पाण्याची गरज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच भविष्यातील पाणीटंचाई यांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय तिलारी धरणातील पाणी बेळगाव जिल्ह्यातील गावांना देण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

        चंदगड तालुक्यातील जनतेच्या हक्काच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच स्थानिक जनतेशी चर्चा करून व त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच पाणीवाटपाबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी म्हटले आहे.

        दरम्यान, चंदगड तालुक्यातील जनतेशी चर्चा करून त्यांच्या मनाचा योग्य तो विचार होईपर्यंत बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरोधातही भूमिका घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घेऊन सीमा भागातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

        या विषयाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन चंदगड तालुक्यातील जनतेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याची वेळ येऊ नये, याची नोंद घ्यावी. तसेच तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करून चंदगड तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती प्रताप पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment