चंदगड : दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गांधी जयंती निमित स्वच्छता अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2026

चंदगड : दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गांधी जयंती निमित स्वच्छता अभियान

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        महात्मा गांधी जयंतीनिमित्त दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड येथे स्वच्छता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळा व महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

        या मोहिमेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत झाडू, फावडे, घमेले, कुदळ आदी साधनांच्या साहाय्याने परिसराची स्वच्छता केली. परिसरातील कचरा, प्लास्टिक व अनावश्यक वस्तू हटवून स्वच्छ व सुंदर परिसर निर्मितीचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. स्वच्छतेविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

        यावेळी प्राचार्य आर. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे,” असे सांगितले. उपप्राचार्य टी. एस. चांदेकर यांनी ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी स्वतः स्वच्छता राखण्याबरोबरच समाजातही स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन केले.

        या स्वच्छता मोहिमेचे नियोजन क्रीडा शिक्षक टी. व्ही. खंदाळे, एस. जी. साबळे व युवराज भवारी यांनी केले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वच्छता सप्ताहाला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप प्राप्त झाले. “स्वच्छ परिसर, निरोगी जीवन आणि सुंदर भारत” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांना कृतीतून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment