राज्यस्तरीय अग्नीपंख टॅलेंट सर्च, कडून चंदगड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2026

राज्यस्तरीय अग्नीपंख टॅलेंट सर्च, कडून चंदगड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा ‘अग्नीपंख टॅलेंट सर्च (ATS)’ अंतर्गत चंदगड तालुक्यातील इयत्ता १ ली ते ४ थी चे गुणवंत विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा गुणगौरव व विशेष सत्कार सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मेडिकल असोसिएशन हॉल, पाटणे फाटा, (ता. चंदगड) येथे उत्साहात पार पडला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची सकारात्मक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने अग्नीपंख टॅलेंट सर्चच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इयत्ता १ ली ते ४ थीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व त्यांच्या यशात मार्गदर्शक ठरलेल्या शिक्षकांचा अग्नीपंख संस्थेचे संस्थापक अर्जुन खापरे व सौ. अश्विनी खापरे, मार्गदर्शक श्री. नितीन कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 यावेळी अग्निपंखचे तालुका प्रतिनिधी बाळाराम नाईक, अडकूर व आमरोळी केंद्राचे सुरज भामरे, नितीन शेरकर, कोवाड केंद्राचे सुनील कुंभार व सौ. प्रमिला कुंभार, माडवळे केंद्राचे प्रशांत पाटील व सदानंद गावडे, चंदगड केंद्राचे विश्वनाथ गावडे व सौ. आसावरी बल्लाळ आदी प्रतिनिधींची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेली मेहनत, जिद्द, सातत्य, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यांचा यावेळी गौरव केला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे महत्त्व  अधोरेखित केले. अग्नीपंख टॅलेंट सर्चच्या माध्यमातून “गुणवत्तेला प्रोत्साहन, प्रतिभेला व्यासपीठ आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना अग्नीपंख” देण्याचा संदेश देत पालक, शिक्षक आणि समाज यांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करताना गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा केवळ सत्कार नसून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरावा आणि ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी पुढे यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व पालक मोठ्या संख्येने हजर होते. मार्गदर्शक शिक्षिका प्रमिला कुंभार यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment