ऊस दरासाठी शिवसेना उबाठाचा एल्गार! थकीत ३०० रुपये तातडीने द्या; चालू हंगामासाठी प्रतिटन ५ हजारांची मागणी, शुकवारी पाटणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन; प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची तयारी - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2026

ऊस दरासाठी शिवसेना उबाठाचा एल्गार! थकीत ३०० रुपये तातडीने द्या; चालू हंगामासाठी प्रतिटन ५ हजारांची मागणी, शुकवारी पाटणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन; प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची तयारी

 


चंदगड : प्रतिनिधी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, मागील हंगामातील थकीत ऊसबिलाची रक्कम तातडीने मिळावी आणि चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन पाच हजार रुपये दर निश्चित करावा, या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

मागील वर्षातील ऊसबिलाचे प्रतिटन ३०० रुपये अद्याप शेतकऱ्यांना मिळणे बाकी असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी पक्षाने केली आहे. त्याचबरोबर चालू हंगामासाठी राज्य शासनाकडून अद्याप दर निश्चित करण्यात आलेला नसल्याने ऊस उत्पादकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. दराबाबत स्पष्टता नसल्याने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरही परिणाम होत असल्याचे पक्षाने निवेदनात नमूद केले आहे.

ऊस पिकवायचा शेतकऱ्यांनी, खर्चाचा भारही त्यांच्यावरच; मग दर ठरवताना विलंब का? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. खतांच्या वाढत्या किमती, मजुरी, शेतीची मशागत आणि वाहतूक खर्च यामुळे ऊस उत्पादनाचा खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिटन पाच हजार रुपये दराची मागणी पुढे आली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी विविध संघटना आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत असताना शिवसेना उबाठानेही या लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधून ऊस दराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे. उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड तालुकाप्रमुख विष्णू गावडे आणि किसान शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुहास बाबू गुरव यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळेपर्यंत दराचा प्रश्न ऐरणीवर ठेवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शुक्रवारी पाटणे फाटा येथे होणाऱ्या आंदोलनाकडे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment