चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासह नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने चंदगड सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने भोगोली वनक्षेत्रातील काजीर्णे धनगरवाड्याजवळ वाहणाऱ्या ओढ्यावर श्रमदानातून नैसर्गिक वनराई बंधारा उभारण्यात आला. अत्यल्प पावसामुळे आटू लागलेल्या ओढ्यांमधील पाणी अडवून ते स्थानिक वन्यजीव आणि गुराढोरांसाठी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमातून प्रयत्न करण्यात आला आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक नैसर्गिक जलस्रोतांमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत आहे. भोगोली वनक्षेत्रातील संबंधित ओढ्यालगतच्या विहिरीतील पाण्याचा वापर रोपवाटिकेसाठी केला जातो. तसेच या ओढ्यातील पाणी पिण्यासाठी विविध वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर येतात. जवळच्या काजीर्णे धनगरवाड्यातील गुरेढोरेही याच जलस्रोतावर अवलंबून आहेत. त्यामुळे ओढ्यातील उपलब्ध पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक बनले होते.
ही गरज ओळखून वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक उपलब्ध साहित्याचा वापर करून नैसर्गिक वनराई बंधारा उभारला. ओढ्यातील पालापाचोळा आणि गाळ काढून पाणी साचण्यासाठी जागा मोकळी करण्यात आली. त्यानंतर ओढ्यातीलच दगड-गोटे, माती, झाडांच्या फांद्या आणि प्लास्टिकची पोती यांचा वापर करून बंधारा तयार करण्यात आला. यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन छोट्या डोहात पाणी साचण्यास मदत झाली आणि पाण्याची पातळी वाढली.
या उपक्रमात वनपाल सलीम मुल्ला, माणिक खोत, वनरक्षक अरुण सांगळे, वनसेवक पांडुरंग खापरे, रवींद्र पाटील आणि श्रीकांत तराळ यांनी वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या समवेत प्रत्यक्ष श्रमदान केले. बंधारा उभारण्याचे काम सुरू असताना पावसाच्या सरी बरसल्याने उपस्थितांना सुखद अनुभव आला. जणू निसर्गानेही या पर्यावरणपूरक उपक्रमाला दाद दिल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
या बंधाऱ्यात साठणारे पाणी वन्यप्राणी आणि गुराढोरांसाठी उपयुक्त ठरणार असून, पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी स्थानिक पातळीवर अडविण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. अशा लहान स्वरूपाच्या जलसंधारणाच्या कामांतून नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.
वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी यापुढेही श्रमदानातून अशा प्रकारचे आणखी बंधारे उभारण्याचा मानस व्यक्त केला. तसेच पाणी बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वनसंवर्धन म्हणजे केवळ वृक्षलागवड नव्हे, तर वन्यजीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पाणी आणि अधिवासाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चंदगड सामाजिक वनीकरण विभागाचा हा उपक्रम त्याच व्यापक पर्यावरणीय जाणिवेची प्रचिती देणारा ठरत आहे.

No comments:
Post a Comment