सुगम गायनात र. भा. माडखोलकर महाविद्यालयाची सुरेल भरारी! जिल्हास्तरीय युवा महोत्सवात वैष्णवी घोरपडे हिचा तृतीय क्रमांक; अडकूरच्या सुरांनी गाठले जिल्हास्तरीय व्यासपीठ - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2026

सुगम गायनात र. भा. माडखोलकर महाविद्यालयाची सुरेल भरारी! जिल्हास्तरीय युवा महोत्सवात वैष्णवी घोरपडे हिचा तृतीय क्रमांक; अडकूरच्या सुरांनी गाठले जिल्हास्तरीय व्यासपीठ

वैष्णवी घोरपडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ४६ वा कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ जयसिंगपूर महाविद्यालय, जयसिंगपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवातील सुगम गायन स्पर्धेत र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडची विद्यार्थिनी वैष्णवी घोरपडे हिने तृतीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय व्यासपीठावर आपल्या सुरांची मोहोर उमटवली. आता तिची राज्यस्तरावर होणाऱ्या युवक महोत्सवासाठी निवड झालेली आहे.तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह चंदगड तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंदगड तालुक्यातील अडकूरची कन्या असलेल्या वैष्णवीचा संगीतप्रवास हा केवळ एका स्पर्धेतील यशाचा प्रवास नसून, घराण्यातील संगीताची आवड, गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या जिद्दीने घडलेली सुरेल वाटचाल आहे. वैष्णवीला संगीताचा वारसा तिचे काका संदीप घोरपडे यांच्याकडून मिळाला. तिचे बाबा बाबासाहेब घोरपडे यांनाही संगीताची विशेष आवड होती. मात्र परिस्थितीमुळे त्यांना संगीताचे शिक्षण घेता आले नाही. कुटुंबातील ही अपूर्ण राहिलेली संगीताची ओढ वैष्णवीच्या रूपाने पुढे प्रवाहित झाली.

अडकूर येथील बाल भजनी मंडळात ती सुरुवातीपासूनच गायनाचा सराव करू लागली. याच वातावरणातून तिच्या सुरांना आकार मिळत गेला. त्याचबरोबर दत्ता सावंत गुरुजी ह्यांच्याकडे प्रथम सांगीतिक शिक्षण सुरू केले...मात्र दहावीनंतर तिचे शिक्षण थांबण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी अभिजीत सुधाकर पाटणे सर (बेळगुंदी) यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवीने गायनाच्या परीक्षा पूर्ण केल्या. त्यामुळे तिच्या संगीतप्रवासाला शिस्तबद्ध दिशा मिळाली.

यानंतर तिच्या संगीतप्रवासाला गुरू अभिजीत सुधाकर पाटणे सर यांच्या मार्गदर्शनाची साथ मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवीने गायनातील बारकावे, स्वर-तालाचे भान आणि सादरीकरणाची शैली आत्मसात केली. तबलावादक स्वप्निल कुंभार यांचीही तिला मोलाची साथ लाभली.

बारावीनंतर संगीतातच करिअर करण्याचा निर्धार वैष्णवीने केला. आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तिने र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड येथे प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच तिने संगीताची साधना सुरू ठेवली. महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए. डी. कांबळे आणि डॉ. अंजली माने यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, ‘पंढरीशी जारे आल्यानो संसारा...’ या गीताचा अल्बम वैष्णवीने गायला असून, तिचे गुरू अभिजीत सुधाकर पाटणे यांनी या गीताला संगीतबद्ध केले आहे. हा अल्बम सध्या YouTube वर उपलब्ध असून, त्यातूनही वैष्णवीच्या गायनाची ओळख रसिकांपर्यंत पोहोचत आहे.

जयसिंगपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील सुगम गायन स्पर्धेत वैष्णवीने आपल्या सुमधुर आवाजाने, भावपूर्ण गायनाने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने दाद मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. व मध्यवर्ती साठी निवड झाली...स्थानिक बाल भजनी मंडळातून सुरू झालेला तिचा सुरांचा प्रवास आता जिल्हास्तरीय व्यासपीठावर पोहोचला आहे.

वैष्णवीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. अंजली माने, तिचे गुरू, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि अडकूर परिसरातील कला रसिकांकडून तिचे अभिनंदन होत आहे.

वडील बाबासाहेब घोरपडे यांच्या अपूर्ण राहिलेल्या संगीतस्वप्नांना पुढे नेत, काका संदीप घोरपडे यांच्या प्रेरणेने आणि गुरूंच्या मार्गदर्शनातून वैष्णवीने अडकूरच्या मातीतून सुरू केलेली सुरांची साधना आता जिल्हास्तरीय मंचावर पोहोचली आहे. तिचा तृतीय क्रमांक हा केवळ स्पर्धेतील यश नसून, एका संगीतप्रेमी कुटुंबाच्या वारशाला मिळालेली सुरेल दाद आहे.

No comments:

Post a Comment