चंदगड (प्रतिनिधी) :
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन ३०० रुपये थकीत रक्कम तातडीने मिळावी, तसेच चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन पाच हजार रुपये ऊस दर निश्चित करावा, या मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजता चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे बेळगाव-वेंगुर्ला या प्रमुख मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर, चंदगड तालुकाप्रमुख विष्णू गावडे आणि आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन ३०० रुपये थकीत रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने ती तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावी. तसेच चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन पाच हजार रुपये ऊस दर निश्चित करावा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.
ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत असताना त्यांच्या थकीत रकमेबाबत विलंब करणे अन्यायकारक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, चंदगड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन थांबवून आंदोलकांनी रस्त्याच्या एका बाजूला होऊन वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्याची सूचना केली. यावेळी आंदोलक आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाली. पोलिस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, जिल्हा महिला संघटिका शांताताई जाधव, आजरा तालुकाप्रमुख युवराज शामराव पवार, गडहिंग्लज तालुकाप्रमुख अजित पांडुरंग खोत, तालुकाप्रमुख शिवाजी पाटील, चंद्रकांत होरकटे, शंकर मुर्डेकर, अर्जुन हेब्बाळकर, श्रेयस शिवशंकर कांबळे, विशाल चव्हाण, दिगंबर पाटील, सुहास गुरव, उपतालुकाप्रमुख यल्लाप्पा मुतकेकर, विभागप्रमुख मनोहर पाटील, एकनाथ वाके, सुशील दळवी, किरण नागुर्डेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment