कुस्तीची पंढरी कोवाड येथे भव्य क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्र शासनाकडून २० एकर जागा मंजूर; ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळणार आधुनिक क्रीडा सुविधांचे व्यासपीठ - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2026

कुस्तीची पंढरी कोवाड येथे भव्य क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्र शासनाकडून २० एकर जागा मंजूर; ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळणार आधुनिक क्रीडा सुविधांचे व्यासपीठ



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा विकासाला मोठी चालना मिळणार आहे. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोवाड येथे भव्य व अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून २० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोवाडच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

या क्रीडा संकुलाच्या उभारणीनंतर ग्रामीण भागातील होतकरू व गुणवंत खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः कुस्तीपटूंसह विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना आपल्या कौशल्याला वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

ग्रामीण भागात अनेक गुणवंत खेळाडू असून, योग्य सुविधा आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या गुणवत्तेला अपेक्षित संधी मिळत नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी कोवाड येथे उभारण्यात येणारे क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्या क्रीडागुणांना वाव देणे आणि त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणे हे ध्येय असून, चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठीही कटिबद्ध असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

कोवाड येथे २० एकर जागा मंजूर झाल्याने परिसरातील क्रीडाप्रेमी, कुस्तीपटू आणि युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या क्रीडा संकुलामुळे कोवाडची कुस्ती क्षेत्रातील ओळख अधिक बळकट होण्यासोबतच चंदगड तालुक्याच्या क्रीडा वैभवातही भर पडण्याची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment