![]() |
| कागणी- कालकुंद्री दरम्यान आठ महिन्यापूर्वी बांधलेल्या मोरीवर पडलेले अपघातांना निमंत्रण देणारे धोकादायक खड्डे. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
मागील उन्हाळ्यात कागणी ते राजगोळी रस्त्यावरील कागणी ते कालकुंद्री व राजगोळी बुद्रुक ते राजगोळी खुर्द दरम्यानच्या ओढ्यांवरील नादुरुस्त मोऱ्या रुंदी वाढवून पुन्हा बांधण्यात आलेल्या आहेत. बांधकामाच्या दर्जाबाबत काम सुरू असतानाच मार्गावरील ग्रामस्थ, वाहन चालक व प्रवाशांच्या तक्रारी सुरूच होत्या. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली असली तरी त्यावरील रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. परिणामी इथे पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघाताचे प्रकार रोज घडत आहेत. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
आठ महिने उलटून गेले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे इकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवासी वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मागणीस अनुसरून मार्गावरील ग्रामपंचायती व प्रवासी, वाहनधारक संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) चंदगड यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात मोरी बांधकामांची गुणवत्ता व दर्जाची तपासणी करावी, या मुख्य मागणीसह मोरीवर तसेच मोरीच्या व दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यावर पडलेले खड्डे, उखडून गेलेले डांबरीकरण वर आलेली अपघातांना निमंत्रण देणारी खडी व दगड धोंडे, रात्री अपरात्री अनोळखी वाहन व चालकांना होणारा धोका टाळण्यासाठी तात्काळ दर्जेदार डांबरीकरण करून रस्ता सुरक्षित करावा. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करावी तसेच रस्त्यावर वाढलेली वापरताना आमंत्रण देणारी झुडपे तोडून साफ करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
देण्यात आलेल्या निवेदनावर उपसरपंच संभाजी पाटील, गजाभाऊ पाटील, राजू रेडेकर, अर्जुन हेबाळकर (कुदनुर), सुरेश नाईक, पांडुरंग गायकवाड, किरण कोले, अनिल तेऊरवाडकर, गुरुनाथ पाटील, पुंडलिक जोशी आदींच्या सह्या असून यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment