किल्ले बांधण्यासाठी चिमुकल्यांचे हात लागले कामाला, शहरासह ग्रामीण भागातही उत्साह - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2026

किल्ले बांधण्यासाठी चिमुकल्यांचे हात लागले कामाला, शहरासह ग्रामीण भागातही उत्साह



संपत पाटील, चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बांधण्यात येणाऱ्या ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणी हा बालचमुंच्या उत्साहाचा विषय असतो. सध्या चंदगड तालुक्यासह नजीकच्या कर्नाटक सीमा भागात छोटे-मोठे ग्रुप करून बालमंडळे किल्ला बांधणीत व्यस्त झाली आहेत. तहानभूक हरवून किल्ला बांधण्यासाठी लागणारे दगड, माती, विटा, शिवराय, मावळे व सैनिकांच्या प्रतिकृती जमा करण्यासाठी अनेक छोटे हात राबत आहेत. बालचमू चिखल मातीत न्हाऊन निघाले असून चिखलाने माखलेल्या कपड्यांची तमा न बाळगता सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

   या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लहान मुले प्रत्यक्षात अनुभवत आहेत. किल्ला बांधणी स्पर्धांच्या निमित्ताने छत्रपतींच्या स्वराज्यातील अनेक परिचित व अपरिचित किल्ले व त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांचे महत्त्व यांचा अभ्यास या निमित्ताने होत आहे. विविध ऐतिहासिक ग्रंथ पुस्तकांसह मोबाईलच्या माध्यमातून गुगल सर्च करून अपरिचित किल्ल्यांची माहिती जमवून परीक्षकांना अचूक माहिती देण्याकडे बालमंडळांचा कल दिसतो आहे. तर काही चिमुकले हात केवळ किल्ला बांधणीचा आनंद लुटण्यात मग्न आहेत.

   किल्ला प्रतिकृती बांधून तयार झाल्यानंतर त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना विराजमान करण्याबरोबरच किल्ल्यांच्या तटबंदीवर संरक्षणासाठी तैनात मावळ्यांचे सैन्य, तोफा यांच्या प्रतिकृतींची विक्रीसाठी बाजारात आल्या असून त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. बालचमुंचे हट्ट पुरवण्यासाठी घरातील मोठी मंडळी ही त्यांना आनंदाने सहकार्य करताना दिसत आहेत. 

    किल्ला बांधणी करताना जलदुर्ग, डोंगरी किल्ले, भुईकोट किल्ले असे किल्ल्यांचे विविध प्रकार; त्यावरील तटबंदी, बुरुज, दरवाजे, पाण्याचे टाके, तलाव, विहिरी, मंदिरे, भुईकोट किल्ल्यांचे खंदक यांची मांडणी कल्पकतेने केली जात आहे. 

  एकंदरीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बांधल्या जाणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणीत बालचमुंच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आल्याचे चित्र शहरासह खेडोपाडी ही दिसून येत आहे. 

No comments:

Post a Comment