गडहिंग्लज, हातकणंगले सह महाराष्ट्रातील ६ तालुके दुष्काळी जाहीर! गडहिंग्लज करांचे आंदोलन व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2026

गडहिंग्लज, हातकणंगले सह महाराष्ट्रातील ६ तालुके दुष्काळी जाहीर! गडहिंग्लज करांचे आंदोलन व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश



चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     गडहिंग्लज तालुक्यासह महाराष्ट्रातील सहा अंकी सहा तालुके दुष्काळी जाहीर केल्यामुळे आंदोलनाला यश आले आहे या कामी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. याला यश आले असून शासनाने नव्या शासन निर्णयानुसार या तालुक्यांच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश केला आहे.

  या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्देशानुसार दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यामधील प्रमुख ५ पिकांच्या २० टक्के सर्व्हेक्षण, ग्राऊंड ट्रूथिंग केंद्र शासनाच्या निकषानुसार करण्यात आले. त्या नंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेला अहवाल दि. १७.११.२०२६ रोजी मंत्रिमंडळ उपसमिती समोर सादर करण्यात आला असता, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज हे ०६ तालुके दुष्काळी तालुके म्हणून घोषित करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या तालुक्यांमध्ये खाली प्रमाणे विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

१) जमीन महसूलात सूट

२) पिक कर्जाचे पुनर्गठन

३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती

४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट (७.५ हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या विजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे. त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल)

५) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी

६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे

७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर

८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

९) शेतीवर आश्रित शेतकरी/मजूर इत्यादी यांना अन्न धान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे

१०) जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे

११) जलसंधारणाची कामे सुरु करणे

१२) अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे.

शेतकरी आणि नागरिकांना वरील फायदे होऊ शकतात.

No comments:

Post a Comment