भरत कुंडल हेमरस (ओलम) बिझनेस हेड |
गतवर्षातील ऊसाच्या गळीत हंगामात राजगोळी खुर्द
(ता. चंदगड) येथील हेमरस (ओलम) साखर कारखान्याने 16 डिसेंबर 2017 नंतर गाळप झालेल्या ऊसाला
प्रतिटन 2620 रुपया प्रमाणे रक्कम अदा केली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती
विचारात घेऊन यावर्षी दीपावली सणानिमित्त 16 डिसेंबर 2017 नंतर
गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 200 रुपयांचे बिल सोमवार ता. 29 डिसेंबर 2018 रोजी
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत आहोत अशी माहिती हेमरसचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी
दिली. ते म्हणाले, ``गडहिंग्लज विभागात
आतापर्यंत हेमरसने जास्तीत जास्त दर दिला आहे. प्रत्येक वर्षी दराची कोंडी हेमरस
कडूनच फोडली जाते. यावर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वीच आम्ही 200 रुपयांचे बिल
शेतकऱ्यांना देत आहोत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कारखान्याची वाटचाल सुरु आहे. त्यामुळेच
प्रत्येक वर्षी गडहिंग्लज विभागात उच्चांकी ऊसाचे गाळप केले आहे. गेल्या गळीत
हंगामात सुरुवातीला साखरेचे दर कमी झाल्याने राज्यातील सर्वच कारखान्यांना एफआरपीची
रक्कम देणे अवघड झाले. अशा परिस्थितीत हेमरसने मात्र सर्व झालेल्या उसाला प्रतिटन 2620
इतकी रक्कम अदा केली. हंगामात कारखान्याने 5 लाख 59 हजार 830 मेट्रिक टनाचे गाळप
केले होते. चालू वर्षी 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. ऊस
दरातही आम्ही कमी पडणार नाही. ऊसाची वेळेत उचल व्हावी म्हणून कारखान्याने कोट्यावधीची
गुंतवणूक केली आहे. पुरेशी तोडणी व वाहतूक यंत्रणा तयार असल्याने चालू गळीत
हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे हेमरसला
जास्तीत जास्त उसाचा पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी
शेती अधिकारी सुधीर पाटील व व्यवस्थापक सतीश भोसले उपस्थित होते.