अन्यायग्रस्त महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज – ॲड. रवि रेडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2018

अन्यायग्रस्त महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज – ॲड. रवि रेडेकर


देशाला विकसीत करायचे असेल तर महिलांच्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. देशाच्या विकासासाठी महिलांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी बलात्कारित व अन्यायग्रस्त महिलांचे मनोधैर्य वाढवावे. त्यांना कायद्याचे बळ देऊन उभारी देण्याची गरज आहे. त्यासाठी अन्यायग्रस्त महिलांनी धाडसाने कायद्याचा आधार घेतला पाहिजे असे प्रतिपादन गुरुकुल चॅरिटेबलचे अध्यक्ष ॲड. रवी रेडेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोग व दिशा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात कायदेविषयक महिला जनजागृती मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य विद्या पाटील अध्यक्षस्थानी होत्या.

चंदगड येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात कायदेविषयक महिला जनजागृती मेळाव्यात बोलताना ॲड. रवि रेडेकर, समोर उपस्थित महिलावर्ग. 
ॲड. रवि रेडेकर यांनी महिलांचे कायदे, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक शोषण आणि तंत्रज्ञान विनिमय व दुरुपयोग, लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षण,  हिंदू वारसा हक्क, सायबर गुन्हा, अनैतिक व्यापार, प्रतिबंध कायदा, तिहेरी तलाक व भारतीय दंड संहितेत महिलांना लागू होणाऱ्या तरतुदी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आनंदा शिंदे यांनी कौटुबिंक हिंसाचाराबाबत माहिती देऊन कायद्याअंतर्गत महिलांना कोणते हक्क प्राप्त होऊ शकतात. याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या संचालिका सौ. स्वप्नाली गवस यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला. संस्थेच्या संस्थापक विद्या तावडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तहसीलदार शिवाजीराव शिदे, पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांनी मनोगते व्यक्त केली. माधुरी सावंत भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संजना कागणकर यांनी आभार मानले.