चंदगड अर्बन चषक 2018 क्रिकेट स्पर्धेमध्ये पीके इलेव्हन अजिंक्य - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2018

चंदगड अर्बन चषक 2018 क्रिकेट स्पर्धेमध्ये पीके इलेव्हन अजिंक्य

चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटाकवलेला पी के इलेव्हन संघ.

चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड अर्बन बँकेच्या वतीने बँकेच्या इतिहासात प्रथमच आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पीके इलेव्हन संघाने सॅम स्पोर्टर्स संघाच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. अंतिम सामन्यामध्ये रोमहर्षक खेळ करुन एक षटक ठेवून अजिंक्यपद पटकावले. र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या शिवाजी स्टेडीयमवर स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये 52 संघांनी सहभाग घेतला होता.
चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये बांदेश्वर बांधा संघाने तिसरा क्रमांक तर बहाद्दुरवाडी बेळगाव संघाने चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेमध्ये बांदा, निपाणी, कोनाळकट्टा, बेळगाव, बहादुरवाडीसह चंदगड येथील संघानी भाग घेतला होता. स्पर्धेतील अंतिम सामना पिके इलेव्हन चंदगड व श्याम स्पोर्ट्स चंदगड यांच्यामध्ये झाला. पीके इलेव्हनने नाणेफेक जिंकून सॅम स्पोर्ट्सला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. त्यांनी दहा षटकांमध्ये सुंदर फटकेबाजी करत पिके इलेव्हन समोर शंभर धावांचे आव्हान उभे केले. पीके इलेव्हनने सुरवातीपासून उत्तम खेळ करत चौफेर फटकेबाजी केली. सॅम स्पोर्ट्सचे 101 धावांचे आव्हान 9 षटकामध्ये पार केले. पीके इलेव्हनने सॅम स्पोर्ट्सवर सात विकेटने विजय मिळविला. विजयानंतर खेळाडूंनी मैदानामध्ये जल्लोष साजरा केला. विजेत्या पीके इलेव्हन संघाला रोख 31 हजार रुपये व ट्राफी, सॅम स्पोट्स संघाला रोख 21 रुपये व ट्राफी, बांदेश्वर बांधा संघाला रोख 11 रुपये व ट्राफी व बहाद्दुरवाडी बेळगाव संघाला रोख 6 रुपये व ट्राफी देण्यात आली. अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडीयमवर प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती.
मॅन ऑफ द सिरीज प्रशांत सॅम स्पोर्ट्स, मॅन ऑफ द मॅच संडी पिके इलेव्हन उत्कृष्ट फलंदाज प्रशांत, उत्कृष्ट गोलंदाज संडी व उत्कृष्ट झेल चंद्रकांत ओऊळकर यांना देण्यात आली. विजेत्यांना चंदगड अर्बन बँकेचे व पं. स. सदस्य चेअरमन दयानंद काणेकर, व्हाईस चेअरमन बाबुराव हळदणकर, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, संचालक संजय ढेरे, अरुण पिळणकर, माजी जि. प. सदस्य राजेद्र परीट, सुरेश सातवणेकर, सुनिल देसाई, उर्मिला भातकांडे, संपदा भिसे, बँकेचे मॅनेजर नौशाद मुल्ला यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांनी गावातील तरुण मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. दहा दिवस चाललेली स्पर्धा पार पाडण्यासाठी बँकेचे कर्मचारी वर्ग, युवा स्पोर्ट्स चदंगडचे खेळाडू व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
चंदगड अर्बन चषक 2018 क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण करताना बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर व इतर पदाधिकारी.