किल्ले पारगडची तटबंदी झाडाझुडपांच्या विळख्यात,संवर्धनाकडे शासनाचे दुर्लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2018

किल्ले पारगडची तटबंदी झाडाझुडपांच्या विळख्यात,संवर्धनाकडे शासनाचे दुर्लक्ष

किल्ले पारगड (ता. चंदगड) येथील तटबंदीला पडलेला झाडझुडपांचा विळखा. 

कालकुंद्री / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडावरील शिवकालीन दगडी तटबंदी झाडाझुडपांच्या विळख्यात सापडली आहे. आठ फूट रुंदीच्या तटबंदी भिंतीवर वाढलेल्या झाडाझुडपांची मुळे कित्येक वर्षापासून हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होत आहे. शासनाचे संबंधित विभाग लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांचे इकडे लक्ष नाही. असा आरोप करत शिवप्रेमी व पर्यटकातून नापसंती व्यक्त होत आहे.
गोव्यातील पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सन १६७४ साली पारगड किल्ला वसवला. कोंढाणा लढाईत शहीद झालेल्या तानाजी मालुसरे यांचा पुत्र रायबा उर्फ रायाजी मालुसरे यांना पहिला किल्लेदार म्हणून नेमणूक करत पाचशे मावळे दिमतीला दिले असा इतिहास आहे. पारगडच्या तटबंदीचे दगड ढासळत आहेत. वाहतुकीची कोणतीही सुविधा नसलेल्या काळात एवढे मोठे दगड कुठून आणले असावेत हाच पर्यटक व शिवप्रेमींच्या अभ्यासाचा विषय आहे. तीच तटबंदी शासनाच्या उदासीन धोरणामुळे अस्तंगत होण्याची भीती शिवप्रेमी व्यक्त करत आहेत. एकंदरीत हा शिवकालीन ठेवा जपण्यासाठी तात्काळ कार्यवाही होण्याची मागणी आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी हा किल्ला दोन वर्षापूर्वी दत्तक घेण्याची घोषणा केली होती. या काळात गड संवर्धनाची कोणतीच हालचाल झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गडावरील रहिवासी शेलार यांचे वंशज व सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी शासनाने गडावरील रस्ते, पिण्याचे पाणी ,नियमित विज या सुविधांसह रहिवाशांच्या उपजीविकेचे साधन निर्माण करावे अशी मागणी केली आहे.


No comments:

Post a Comment