बिबट्याच्या अस्तित्वाने शेतकरी धास्तावला, पोटासाठी शेती करावी की जीव वाचवावा हा प्रश्न? - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2018

बिबट्याच्या अस्तित्वाने शेतकरी धास्तावला, पोटासाठी शेती करावी की जीव वाचवावा हा प्रश्न?

चंदगड तालुक्यातील माडवळे, तडशिनहाळ परिसरात आढळून आलेला बिबट्या. 


निवृत्ती हरकारे  / मजरे कारवे
चंदगड तालुक्यात जंगली जनावारांच्याकडून शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसानीचे सत्र सुरुच आहे. त्यात पश्चिम भागात जंगल भाग जास्त असल्यामुळे व मानवी वस्ती जंगलाच्या जवळ गेल्याने हे नुकसान जास्त होत आहे. मात्र सध्या तालुक्याच्या पूर्व भागात जिथे जंगल अगदी तुरळक आहे. किंबहुना जंगलाचे अस्तित्वही नाही. अशा भागात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने शेतकरी धर्मसंकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अस्वल, गवे, रानडुक्कर इत्यादी जंगली जनावरांचा वावर या परिसरात दिसत होता. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कुद्रेमानी, माडवळे, तडशीनहाळ, सुपे, ढेकोळी परिसरात बिबट्या वाघाचे दर्शन झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी शेती करावी तर जंगली जनावारांकडून शिकार होण्याची भिती. त्यामुळे पोटासाठी शेती करावी की जीव वाचवावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
सध्या या परिसरात सुगी सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत  शेतकरीवर्ग शेतीच्या कामांमध्ये गुंतलेला असतो. रताळी काढणी, भात कापणी, मळणी, नाचना काढणी व मळणी अशी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ओलम सुगर व  इको केन  सुगर हे दोन्हीही साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे ऊस तोडणी लगबग सुरू आहे. शेतकरीवर्ग शेती कामांमध्ये व्यस्त असताना या परिसरात वाघाचे दर्शन झाले. हि बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने हातातील कामे अर्ध्यावर टाकून शेतकरी घरची वाट धरत आहेत. हे गेले पंधरा दिवस या परिसरात पाहावयास मिळत आहे. प्रमुख राज्य मार्ग असलेल्या बेळगाव-वेंगुर्ला मार्गालगत दोन दिवसांपूर्वी या वाघाचे दर्शन झाल्याने प्रवाशांनी धास्ती घेतल्याने रात्री आठ नंतर प्रवास करण्याचे टाळले जात आहे.
अफवांना ऊत
सलग पंधरा दिवस या वाघाच्या दर्शनाची चर्चा या परिसरात सुरु आहे. त्यामुळे जिथे-तिथे वाघ दिसला अशा अफवा परिसरात पसरू लागल्या आहेत. कार्वे येथील नदीकाठावर वाघ दिसला, अशी बातमी काहींनी सांगितली. मात्र प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ती अफवा निघाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. वाघाचा कुठलाही फोटो व्हायरल करून अफवा पसरवल्या जात आहेत. त्यासाठी

महावितरणने शेतीसाठीची वीज दिवसाची द्यावी
बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात महावितरण कडून सद्या चार दिवस रात्रीची व तीन दिवस दुपारची वीज दिली जाते. रात्री-अपरात्री शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी जात असल्याने त्यांच्या जीवाला जंगली प्राण्यांकडून धोका होवू शकतो. त्यामुळे दिवसा विजेचा पुरवठा करावा.

दोन वनखात्याच्या वादात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
ज्या परिसरात बिबट्या फिरत आहे. तो परिसर कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आहे. त्यातील काही भाग कर्नाटकात तर काही भाग महाराष्ट्रात आहे. कुद्रेमनी, धामणे ही गावे कर्नाटकात असल्याने तेथे बेळगावचे वनखाते कार्यरत आहे, तर माडवळे, तडशीनहाळढेकोळी येथे पाटणे वनखाते कार्यरत आहे. मात्र सकाळीहा बिबट्या कुद्रेमणीत तर दुपारी ढेकोळीत अशी अवस्था झाली आहे.  त्यामुळे येथील वनखात्याचे कर्मचारी  हात वर करीत आहेत. बिबट्या कोणाचाही हद्दीत असला तरी त्याला पकडणे सद्या कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे दोन्ही खात्याकडून प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

वनविभागाकडून लोकांच्यामध्ये जागृतीची गरज
वनविभागाने माडवळे, सुपे, तडशिनहाळ परिसरात बिबट्या आल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी. रात्रीच्या वेळी बिबट्या आढळल्यास काय करावे. बिबट्या आल्यानंतर लोक त्याला पाहण्यासाठी गर्दी करत असून यातून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघ असेल तिथे आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिक मोठ्या संख्येने वाघाच्या पाठीमागे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो घेण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. यासाठी वनविभागाच्या वतीने लोकांच्यामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी सापळा व पथक तैनात
तडशिनहाळ व ढेकोळी जवळ सापळे लावलेले आहे. लवकरच हा बिबट्या जेरबंद केला जाईल. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने पथक तैनात केले आहे. हे पथक दिवसा व रात्री गस्त घावून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे पाटणेचे वनक्षेत्रपाल एम. एन. परब यांनी सांगितले.
निवृत्ती हारकारे
मजरे कार्वे / प्रतिनिधी 








No comments:

Post a Comment