समानीकरण झाल्यानंतर तात्काळ शिक्षकांच्या जागा भरणार- सीईओ मित्तल यांचे आश्‍वासन - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2018

समानीकरण झाल्यानंतर तात्काळ शिक्षकांच्या जागा भरणार- सीईओ मित्तल यांचे आश्‍वासन


चंदगड - येथील पंचायत समितीमध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी अमन मित्तल  यांचा सत्कार करताना पं. स. सभापती बबनराव देसाई, शेजारी उपसभापती विठाबाई मुरकुटे, बीडीओ आर. बी. जोशी.

चंदगड / प्रतिनिधी
समानीकरण झाल्यानंतर चंदगड तालुक्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा त्वरीत भरल्या जातील असे सांगून आरोग्य विभागासह इतर विभागातील चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदे तात्काळ भरण्यास आपण कटिबध्द असल्याचे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले. चंदगड येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती बबनराव देसाई होते.
विषय पत्रिकाचे वाचन संजय चंदगडकर यांनी केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांनी करुन तालुक्याच्या विकासाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर कामासाठी ५ लाख रुपये मिळावे. पं. स. व  जि. प. च्या तालुक्यातील मोकळ्या जागेत झालेले अतिक्रमण काढावे असे दोन ठराव मांडण्यात आले. मुख्यकार्यकारी अधिकारी अमित्तल म्हणाले, ``शाळा कंपाऊंड व क्रीडांगणाचे प्रस्ताव पाठवून द्या. त्याला तात्काळ निधी देऊ असे सांगून पं. स. च्या प्रत्येक मासिक सभेच्या अगोदर प्रत्येक खातेप्रमुखांनी आपल्या विभागाची टिप्पणी गटविकास अधिकारी, सभापती व सदस्य यांच्याकडे सादर करावी. त्यानंतरच मासिक सभेचे आयोजन करुन त्याबाबतचा आढावा  द्यावा. प्रत्येक मासिक सभेत जे ठराव करणार त्याची अंमलबजावणी आठवड्याभरात करावी असे सांगितले.`` यावेळी शाळा व आरोग्य विभाग यांना वीज वितरण कंपनी कमर्शियल दराप्रमाणे बिल आकारणी करत आहे हे कमी करावे. तालुक्यात असलेल्या वीज कंपनीच्या सबस्टेशनची आकारणी ग्रामपंचायतींनी करुन त्यांच्याकडून कर वसुल करावा अशी सूचना जि. प. सदस्य कल्लापा भोगण यांनी मांडली. पं. स. सदस्य दयानंद काणेकर यांनी तालुक्याला तीन वर्षे झाली तरी गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे ते तात्काळ भरावे अशी मागणी केले. तालुक्याला शासनाकडून होणाऱ्या पुरवठापैकी ५० टक्के पुरवठा कमी असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांच्या संतप्त रागाला डॉक्टरांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे चंदगड आरोग्य विभागाला पुरेसा औषध पुरवठा करावा अशी मागणी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. एस. एस. पाटील यांनी केली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी एस. एस. सुभेदार यांनी जे. पी. नाईक माजी शाळा अभियानांतर्गत चंदगड तालुक्यात प्रभावी काम सुरु असल्याचे सांगितले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे एस. एस. सावळगी, आरोग्य अधिकारी डॉ. गवळी, बांधकाम विभागाचे विजय शेळके, ग्रामविस्तार अधिकारी ए. एस. आळंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी शिर्के, सामाजीक वनीकरण, वनविभागाचे दयानंद पाटील आदींनी आढावा सादर केला. यावेळी झालेल्या चर्चेत जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, उपसभापती सौ. विठोबाई मुरकुटे, पं. स. सदस्य ॲड. अनंत कांबळे, रुपा खांडेकर यांनी भाग घेतला. आभार पं. स. सदस्य जगन्नाथ हुलजी यांनी मानले.