कारवे तील बीएसएनएल मनोरा चार दिवसांपासून बंद, ग्राहकांची गैरसोय - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2018

कारवे तील बीएसएनएल मनोरा चार दिवसांपासून बंद, ग्राहकांची गैरसोय




कार्वे / प्रतिनिधी
मजरे कारवे (ता. चंदगड) येथील बीएसएनएल कंपनीचा मोबाईल मनोरा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. येथील सेवाच बंद झाल्याने येथील बी. एस. एन. एल. ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सेवा पूर्ववत सुरू करुन अखंडित सेवा द्यावी. याचबरोबर थ्रीजी सेवा लवकर सुरू न केल्यास येथील ग्राहकांनी सिम कार्डची होळी करणार असल्याचा इशारा दिला आहे.
सोशल मिडिया मुळे जगातील घडामोडी एका क्लिक वर समोर येतात. त्यासाठी उत्तम दर्जाची इंटरनेट व अखंडित सेवा ही ग्राहकांची मागणी आहे. मात्र इतर खासगी कंपन्या चांगली सेवा देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असताना सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने मात्र अजूनही कात टाकली नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बी. एस. एन. एल. कंपनीचे ग्राहक सेवा अभावी खाजगी कंपन्यांकडे वळत आहेत. हलकर्णी औद्योगिक वसाहतीमधील बी. एस. एन. एल. च्या कार्यालयाजवळ पहिला मोबाईल मनोरा उभारण्यात आला होता. या मनोऱ्याची कव्हरेज कार्वे परिसरात मिळत नसल्याची तक्रारी झाली. यासाठी प्रसंगी आंदोलन करून कार्वे येथ दुसरा मनोरा मंजूर करून घेण्यात आला. मात्र या मनोऱ्याच्या सेवेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. महिन्यातून एक-दोन दिवस नेहमीच मनोरा बंद असतो. याबाबत तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ऑफ्टीकल फायबर केबल मध्ये बिघाड झाल्याचे कारण दिले जाते. हे कारण नेहमीचेच झाल्याने यावर ग्राहकामध्ये नाराजीचा सुर आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून या मनोऱ्यावरुन थ्री जी सेना द्यावी अशी मागणी येथील ग्राहक करीत आहेत. यासाठी थ्रीजी सेवेची मंजुरी आहे. यासाठीचे साहित्य आलेले आहे. थ्री जी सेवेबाबत विचारणा केल्यानंतर लवकरच थ्रीजी सुरू होईल, असे ढोबळ उत्तर गेल्या दीड वर्षापासून दिले जात आहे. त्यामुळे या सेवेला येथील ग्राहक कंटाळलेले आहेत. अखंडित सेवा बरोबरच थ्रीजी सेवा येथील ग्राहकांना मिळावी अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. अन्यथा सर्व कार्डांची कार्वे येथे होळी करण्यात येईल असा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे.