जेसीबी मालक संघटनेच्या बैठकीत प्रतितास एक हजार रुपये करण्याचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2018

जेसीबी मालक संघटनेच्या बैठकीत प्रतितास एक हजार रुपये करण्याचा निर्णय


वाढते डिझेलचे दर व स्पेअरपार्टच्या महागाईमुळे चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील जेसीबी व्यवसाय पुर्णत अडचणीत आला आहे. त्यामुळे या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी जेसीबी मालकांनी प्रतितास 1000 रुपये प्रमाणे दर आकारणे गरजेचे आहे. त्यामुळे येथून पुढे जेसीबीचा प्रतितास एक हजार रुपये प्रतितास करण्याचा निर्णय अडकूर (ता. चंदगड) येथे झालेल्या जेसीबी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष लहू गावडे अध्यक्षस्थानी होते.
सध्याचे वाढते डिझेल दर, जेसीबीच्या किमतीत भरमसाठ झालेली वाढ, वाढते आईल दर, स्पेअरपार्ट वाढलेले दर, ड्रायव्हरचा वाढता पगार, बँक कर्जाचे हप्ते यासर्व खर्चाची तोंडमिळवणी होत नसल्याने जेसीबीमालक अडचणीत आले आहेत. दिवसेंदिवस महागाईने कर्जावरील व्याजाचे मीटर वाढत चालल्याने जेसीबी विकण्याच्या निर्णयावर काहीजण पोहोचले आहेत. चंदगड, गडहिंगल्ज तालुक्यातील जेसीबी व्यवसाय अडचणीत आला आहे. शेती व्यवसायाबरोबर घर, विहीर, पाईप लाईन, पाणंद रस्ते आदी कामांसाठी शेतकऱ्यांना जेसीबीचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी लहान, मोठ्या शेतकऱ्यांनी वित्तीय संस्था व बँक कर्ज काढून जेसीबी घेतल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्कर्षात सहभागी झालेली जेसीबी व्यवसायामुळे अनेक कुटुंबांचे चरितार्थ चालत आहेत. त्या व्यवसायाला टिकवून ठेवण्यासाठी व खर्चाची तोंडमिळवणीबरोबर भुमिपुत्रांच्या हाताला काम मिळवण्यासाठी प्रति तास 1000 रुपये दर करणे पर्याय मार्ग असल्याचे जेसीबी संघटनेचे अध्यक्ष लहू गावडे यांनी जाहीर केले. यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील श्रीधर देसाई, पुंडलिक चव्हाण, रामराज देसाई, विलास नाईक, शिवराज नाईक, युवराज कोळी, सुभाष घोरपडे, दशरष भादवणकर, उत्तम पाटील, धोंडिबा कांबळे, विशाल बल्लाळ, संतोष गावडे, अशोक पाटील यांच्यासह गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील जेसीबी मालक उपस्थित होते. आभार श्री. चांदेकर यांनी मानले.