दौलतच्या निर्णायक बैठकीला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - ॲड. संतोष मळविकर - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2018

दौलतच्या निर्णायक बैठकीला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - ॲड. संतोष मळविकर

अॅड. संतोष मळविकर

चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखान्याच्या साईटवर 30 नोव्हेंब 2018 रोजी दौलतबाबत चर्चेअंती निर्णय घेण्यासाठी दौलत बचाव कृती समितीने तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये नेतेमंडळी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. पडद्यामागे घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी व दौलत सुरू करण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. अशा निर्णायक बैठकीला तालुक्यातील शेतकरी, कामगार, सभासद व हितचिंतक यांनी हजर राहावे असे आवाहन दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर यांनी केले आहे.
न्युट्रीयन्स कंपनीबरोबर के.डी.सी.सी. चा रद्द झालेला करार, दौलत मध्ये शिल्लक असणारी साखर, नव्याने काढण्यात येणारे फेरटेंडर, सात तारखेला होणारी जमीन लिलाव प्रक्रिया, हे प्रमुख विषय बैठकीदरम्यान घेण्यात येणार आहेत. जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांना बँकेचे दौलत बाबतचे धोरण मांडण्याचे आवाहन केले आहे. या विशेष बैठकीला तालुक्यातील अनेक नेते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, चेअरमन व संचालक यांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. बैठकीला वेगळे वळण लागून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तहसीलदार यांनी पोलिसांना चोख पोलिस बंदोबस्त  ठेवण्याबाबत सुचना दिल्या आहेत. दौलतच्या निर्णायक बैठकीला सर्वांनी हजर रहावे असे आवाहन ॲड. संतोष मळविकर यांनी केले आहे. यावेळी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, राजेंद्र पावसकर, अनिल होडगे, सुरेश भातकांडे आणि दौलत बचाव समितीचे सदस्य हजर होते.



No comments:

Post a Comment