अनिल धुपदाळे, चंदगड
चंदगड येथील ग्रामपंचायतीला नगरपंचायत दर्जा देण्यात यावा. यासाठी महसूल व
पुनर्वसन तथा बांधकाम खात्याचे मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मागणीचे
पत्र मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना दिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी चंदगड
शहराचा वाढता विस्तार पाहता ग्रामपंचायतीला सुविधा पुरवणे अशक्य होत आहेत.
त्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत होणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हटले
आहे.
या पत्रामुळे चंदगडी शहरवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
चंदगडवासियांनी चंदगडला नगरपंचायत व्हावी म्हणून चार वेळा ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. यासाठी मोर्चे, आंदोलने, साखळी उपोषणाचे मार्ग
अवलंबले होते. लोकांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी घर टू घर
जाऊन नगरपंचायतीचा मुद्दा लोकांना पटवून दिला होता. त्यामुळेच चौथादा बहिष्कार
टाकण्यात यश मिळाले होते. महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी आजवर असा बहिष्काराचा
निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र चंदगडवासियांनी चंदगडला नगरपंचायत व्हावी.
याकरिता तब्बल चार वेळा बहिष्कार टाकून सर्वांचे लक्ष वेधले आहे. वेळोवेळी
चंदगडवासीयांनी उपोषण, आंदोलन, मतदानावर बहिष्कार,यासारखा निर्णय घेऊन शासनाचे लक्ष
वेधून ही याबाबतीत शासनाची मानसिकता नसल्याचे दिसत होते. येत्या लोकसभा
निवडणुकीवरून सुद्धा बहिष्कार टाकण्याची मानसिकता होऊ शकते. त्यामुळे आश्वासनाची
पूर्तता होणे गरजेचे आहे. यापूर्वी कित्येक वेळा सबुरीचा सल्ला ऐकवण्यात आला. कित्येक
वेळा तारीख पे तारीख ऐकून लोक कंटाळले आहेत. अलीकडेही 1 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर
व 1 डिसेंबर
अशा तारखा चर्चेत आल्या आहेत. या वेळी मात्र चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेले
पत्र लक्षात घेता चंदगडला नगरपंचायतचा दर्जा मिळणे सोयीचे झाल्याचे वाटत आहे. लोकसभा
निवडणुकांचा कार्यक्रम लागला तर आचारसंहिता पूर्वी चंदगड नगरपंचायतीचा निर्णय होणे
गरजेचे आहे. तसे न झाल्यास चंदगडवासीय लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू शकतील हे
लक्षात घेऊन चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र
चंदगडवासियांना नगरपंचायत साठी आशावादी ठरले आहे.
अनिल धुपदाळे, चंदगड प्रतिनिधी
No comments:
Post a Comment